वर्षाच्या शेवटी गारपिटीचा तडाखा बसणार; नागपूरसह काही जिल्ह्यात २८, २९ ला पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 07:32 PM2021-12-25T19:32:01+5:302021-12-25T19:32:29+5:30
Nagpur News येत्या दोन दिवसात तापमानात किंचित वाढ हाेणार असून, २८ व २९ डिसेंबरला नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस हाेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नागपूर : राजस्थान व काश्मीरसह उत्तर-पश्चिम भारतात नव्याने तयार हाेत असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि सायक्लाेनिक सर्क्युलेशनमुळे पुढच्या काही दिवसात वातावरणात प्रभाव पडणार आहे. दाेन दिवसात तापमानात किंचित वाढ हाेणार असून, २८ व २९ डिसेंबरला नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस हाेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील २४ तासात गाेंदिया वगळता विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात रात्रीच्या किमान तापमानात १ ते २ अंशाची वाढ झाली आहे. उत्तर भारतात बदलत असलेल्या हवामानामुळे विदर्भासह देशातील इतर भागात वातावरणात बदल दिसून येत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स व सायक्लाेनिक सर्क्युलेशन उत्तर-पश्चिम भागात रविवारी, मध्य भागात साेमवारी तर पूर्व भारताला मंगळवारी प्रभावित करणार आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार, विदर्भात रविवारपासून कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा १ ते ३ अंशाची वाढ हाेण्याची शक्यता आहे. २८ डिसेंबर राेजी नागपूर, अमरावती, गाेंदिया, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यात गारपीट हाेण्याची शक्यता आहे. २९ राेजीसुद्धा हीच शक्यता आहे. ३० डिसेंबरला वातावरण पूर्ववत हाेईल. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट हाेण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, नागपुरात शनिवारी १३.७ अंश किमान तापमानाची नाेंद करण्यात आली. १०.४ अंशासह गाेंदिया आणि ११.४ अंशासह गडचिराेली सर्वात थंड जिल्हे ठरले. इतर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नाेंद झाली. तज्ज्ञांच्या मते, यावर्षी हवामान बदलाचा सर्वाधिक प्रभाव जाणवला. पावसाळा लांबणीवर गेला व कमी दिवसात अधिक पावसाची नाेेंद झाली. उन्हाळा अधिक तीव्रतेने जाणवला तर हिवाळ्यात डिसेंबरच्या मध्यापर्यंत थंडी प्रभावहीन राहिली.