नागपुरात हिवसाळ्यात गारपिटीचा मार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:16 PM2020-01-02T22:16:33+5:302020-01-02T22:31:43+5:30
गुरुवारी तर थंडी, पाऊस यात भरीस भर म्हणून गारपीटदेखील झाली व शहराने निसर्गाची विचित्र महाआघाडी अनुभवली. ऐन हिवाळ्यात नागपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे जनसामान्यांसह शेतकऱ्यांनादेखील मोठा फटका बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील हिवाळा म्हणजे कसा...हवीहवीशी थंडी अन् जोडीला उबदार ‘स्वेटर्स’ची मजा. मात्र हिवाळ्यात अंगात ‘स्वेटर’ घालायचे की ‘रेनकोट’ असा प्रश्न निर्माण झाला तर! एरवी उन-पावसाचा खेळ नेहमीच अनुभवणाऱ्या नागपूरकरांसाठी मागील काही दिवस अक्षरश: परीक्षेचे ठरत आहेत. गुरुवारी तर थंडी, पाऊस यात भरीस भर म्हणून गारपीटदेखील झाली व शहराने निसर्गाची विचित्र महाआघाडी अनुभवली. ऐन हिवाळ्यात नागपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे जनसामान्यांसह शेतकऱ्यांनादेखील मोठा फटका बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आधीच संकटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परत एकदा अस्मानी संकटाचा धक्का बसला आहे.
नागपूर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री गारपिटीसह पाऊस झाला तर शहरात गुरुवारी सकाळपासूनच वादळासह पाऊस सुरू झाला. बऱ्याच ठिकाणी तर गारपीटदेखील झाली. यात प्रामुख्याने खामला, गोपालनगर, प्रतापनगर, दीनदयालनगर, सहकारनगर यासह दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक भागांचा समावेश होता. काही ठिकाणी तर गारांचा खच पडला होता. सकाळी ८.३० पासून ते सायंकाळपर्यंत नागपुरात ३६.८ मिमी पावसाची नोंद झाली. २४ तासात शहरात ५०.२ मिमी पाऊस झाला. सकाळच्या सुमारास पावसाचा जोर जास्त होता. दिवसभर बोचऱ्या थंडीमुळे नागरिक हैराण झाले होते.
पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होेते. यामुळे विद्यार्थ्यांची तसेच चाकरमान्यांची फारच तारांबळ उडाली. अनेक विद्यार्थ्यांना पावसाचा व थंडीचा जोर वाढल्यामुळे शाळांमध्ये जाताच आले नाही.
नागरिकांना भरले कापरे
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातच तापमान घटले आहे. शिवाय शहरात पाऊस असल्याने दिवसभरात तापमानात ९ अंशांची घट दिसून आली. कमाल तापमान १८.४ अंश सेल्सिअस इतके होते तर किमान तापमान १२.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पाऱ्याने २० अंशांची पातळीदेखील गाठली नाही. पाऊस, गारपीट, वारा यामुळे नागरिकांना अक्षरश: कापरे भरले होते व शहरच कुडकुडताना दिसून आले. पुढील २४ तासात वातावरण ढगाळलेले असेल व पाऊस येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे.
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
दुसरीकडे गारपीट आणि वादळ व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील संत्रा, मोसंबीसह खरीप व रब्बी तसेच भाजीपाल्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली. गारपिटीमुळे कळमेश्वर तालुक्यातील मोहपा तसेच नरखेड तालुक्यातील सावरगाव व जलालखेडा परिसरातील संत्र्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या चार तालुक्यांसह हिंगणा, कामठी, नागपूर (ग्रामीण), पारशिवनी, रामटेक, मौदा, कुही, उमरेड व भिवापूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे झाडांना असलेला कापूस भिजला असून, गहू जमिनदोस्त झाला आहे. शिवाय, तुरी, हरभरा आणि भाजीपाल्याच्या विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पिकांना कसा मिळणार समाधानकारक भाव ?
गारांचा मार लागल्याने संत्रा आणि पावसामुळे कापूस व इतर पिकांचा दर्जा खालावणार असल्याने त्यांना बाजारात समाधानकारक भाव मिळणार नाही. जिल्ह्यातील बहुतांश भागातील हरभऱ्याचे पीक फुले फळांवर (घाटे)आले आहे. या काळात हरभऱ्याच्या झाडांना खार येतो. पावसामुळे हा खार धुतल्या गेल्याने हरभऱ्याचे घाटे भरण्याची शक्यता मावळली आहे. शिवाय, धुके व ढगाळ वातावरणामुळे तूर, हरभरा, फुलकोबी, पानकोबी या पिकांवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटकानाशकांची फवारणी करावी लागणार असल्याने त्या पिकांचा उत्पादनखर्च वाढणार आहे.
‘स्वेटर’वर ‘रेनकोट’
घराबाहेर निघताना ‘रेनकोट’ घालावा की ‘स्वेटर’ असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला होता. घसरलेला पारा, पाऊस आणि बोचरा वारा यामुळे शहरात ‘हिवसाळा’ या नव्या ऋतूत अनेक जण ‘स्वेटर’वर ‘रेनकोट’ घालून जाताना दिसून आले.
‘हिल स्टेशन’चा अनुभव
साधारणत: डिसेंबर महिन्यात उपराजधानीत पाऊस पडत नाही. मात्र गुरुवारी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे शहराचे तापमान २० अंशांहून अधिक गेले नाही. त्यामुळे सगळीकडेच ‘हिल स्टेशन’चा अनुभव येत होता. विशेषत: फुटाळा तलाव परिसर, सेमिनरी हिल्स, सिव्हील लाईन्ससारख्या भागांमध्ये तर वातावरणत तसेच झाले होते. दिवसादेखील शहरातील विविध भागात शेकोट्या पेटविण्यास सुरुवात झाली.
नरेंद्रनगरात वाहतूक कोंडी
नरेंद्रनगर रेल्वेपुलाखाली नेहमीप्रमाणे पाणी जमा झाले. यामुळे एका बाजूने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद झाली होती. जमलेल्या पाण्यात चारचाकी वाहनेदेखील अडकली होती. दुसरा भाग सुरू असला तरी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. याशिवाय लोखंडी पूल, धंतोली आरओबी येथेदेखील पाणी साचले होते व वाहतूक कोंडी होती.
नवीन ‘आरओबी’ पाण्यात
मनीषनगर ते वर्धा मार्गदरम्यान नवीन ‘आरओबी’चे बांधकाम सुरू आहे. याचे काम वेगाने सुरू असून येथे कुठल्याही प्रकारे पाणी साचणारच नाही अशी व्यवस्था केल्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात आले होते. परंतु गुरुवारी झालेल्या पावसाने या दाव्यांची पोलखोल केली. नवीन ‘आरओबी’त पाणी जमा झाले होते व तेथून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नव्हता. भरीस भर म्हणून उज्ज्वलनगरमधील रस्त्यांवरील साचलेले पाणीदेखील सातत्याने ‘आरओबी’त पडत होते. आताच याची अशी स्थिती आहे तर प्रत्यक्ष येथे वाहतूक सुरू झाल्यावर काय चित्र असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.