विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज कोसळून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 04:46 PM2021-12-28T16:46:37+5:302021-12-28T18:27:15+5:30

विदर्भातील अनेक जिल्ह्यात वीजगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीटही झाली असून वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Hailstorm with rain in some parts of vidarbha region | विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज कोसळून दोघांचा मृत्यू

विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज कोसळून दोघांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे नागपूरसह अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊसरब्बीसह भाजीपाला पिके आली धोक्यात, शेतकरी संकटात

नागपूर : विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह पाऊस बरसला. भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून एक मुलगा तर, अमरावती जिल्ह्यात एक शेतकरी ठार झाला आहे. 

हवामान खात्याने विदर्भात २८ व २९ तारखेला ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसला असून काही ठिकाणी वीज पडून लोक दगावले आहेत. आधीच दाटलेल्या धुक्यामुळे पिकांवर परिणाम होताना त्यात पावसाची भर पडली असून गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 

नागपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. नागपूरमध्ये काळेकुट्ट ढग दाटले असून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर, नरखेड तालुक्यातील काही भागात सकाळपासूनच अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीतील पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातही गारांसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातील लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कांद्री परिसरांतही गारांसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातील नवेगाव धुसाळा शिवारात वीज कोसळून बारा वर्षीय मुलगा ठार झाला आहे. नयन परमेश्वर पुंडे असे मृत बालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ३:४५ ची ही घटना असून तो आजोबासोबत शेतशिवारात म्हशी चराईसाठी गेला होता. दरम्यान, वीजगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अचानक वीज कोसळल्याने नयनचा मृत्यू झाला. तसेच शेतात तणसीच्या ढिगाजवळ बांधलेल्या बैलजोडीपैकी एक बैल ठार झाला. या पावसामुळे रब्बी पिकांसह टोमॅटो, मिरची, कोबी व भाजीपाल्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यातही मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गारांसह पावसाने हजेरी लावली आहे.

अमरावती शहरात हलका पाऊस पडला असून चिखलदरा येथे आज सकाळपासून धुक्याचे वातावरण आहे. तर,  जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसासह गारपीट झाली असून धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथे दुपारी ४ वाजताच्या सुमारास वीज पडून गजानन बापूराव मेंढे (४२) या कास्तकाराचा मृत्यू झाला.

वरुड तालुक्यातील गाडेगाव-टेमणी शिवारात सकाळी ११ च्या सुमारास काळेकुट्ट ढग दाटून पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू असतानाच काही क्षण कमी आकाराची गार पडली. पावसाने रस्ते ओलेचिंब झाले आहेत. रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा फायदा होत असला तरी वेचणीस आलेला कापूस मात्र पाण्यात भिजला. पावसामुळे शेतात कापूस वेचणीला असलेल्या शेतकरी-मजुरांची ऐनवेळी त्रेधा उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. चणा, गहु, तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलं असून आता कराव तरी काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, नेर, कळंब आणि यवतमाळ तालुक्यात पाऊस असून बाभूळगाव तालुक्यात गारपीट झाल्याची माहिती आहे. वर्धा जिल्ह्यात आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात पावसाची नोंद झाली असून पिकांना फटका बसला आहे. आर्वी तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस तर आष्टीसह आष्टी तालुक्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या.

कडाक्याच्या थंडी नंतर मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला होता. त्यातच आता गारांसह पावसाचे संकेताने जिल्ह्यात शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.  ३० डिसेंबरपर्यत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले आहे. गारपीटीसह पाऊस आल्यास विदर्भात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता अधिक आहे.

Web Title: Hailstorm with rain in some parts of vidarbha region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.