रामटेक, खात, बुटीबाेरी परिसरात गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:06+5:302021-05-11T04:09:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक/खात/बुटीबाेरी : नागपूर जिल्ह्यातील रामटेक, खात (ता. माैदा), बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) येथे व परिसरातील गावांमध्ये ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक/खात/बुटीबाेरी : नागपूर जिल्ह्यातील रामटेक, खात (ता. माैदा), बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) येथे व परिसरातील गावांमध्ये साेमवारी (दि. १०) सायंकाळी वादळासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच या शहर व गावांमध्ये गारपीटही झाली. अंदाजे १५ मिनिटे गारपीट तर एक तास पावसाचा जाेर कायम हाेता. वादळ व जाेरात कडाडणाऱ्या विजांमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते.
रामटेक व खात परिसरात मागील सहा दिवसापासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरीही बरसत आहेत. दिवसा हाेणाऱ्या दमट उकाड्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक वैतागले आहेत. त्यातच साेमवारी सायंकाळी रामटेक शहरासह परिसरात वादळाला सुरुवात झाली. काही वेळात पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली. पावसाचा जाेर अंदाजे एक तास तर गारपिटीचा जाेर १५ मिनिटे कायम हाेता.
ग्रामीण भागातील बहुतांश गावांमध्ये काेराेना संक्रमण आहे. त्यातच सततच्या दमट उकाडायुक्त प्रतिकूल वातावरणामुळे घराघरात ताप, सर्दी, खाेकल्याचे रुग्ण आढळून येत असल्याने तसेच काेराेना संक्रमणामुळे चिंतेत भर टाकली आहे. या पावसामुळे पिकांचे फारसे नुकसान झाले नसले तरी वादळ व गारपिटीमुळे काहींच्या घरांचे नुकसान झाले आहे. वीज काेसळून कुठेही प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही.
...
घरांचे नुकसान
रामटेक शहरातील माकडांचा हैदाेस वर्षभर सुरू असताे. या माकडांनी उड्या मारून छताच्या कवेलूंची वाट लावली आहे. त्यात गारपिटीने भर टाकल्याने गरिबांचे माेठे नुकसान झाले आहे. फुटलेल्या कवेलीमधून पाणी गळत असल्याने काहींच्या घरातील गृहाेपयाेगी साहित्य भिजले तर काहींना पावसाचे पाणी गाेळा करण्यासाठी घरात ठिकठिकाणी भांडी ठेवावी लागली व त्यातील पाणी वारंवार फेकावे लागले. वादळामुळे रामटेक शहरासह तालुक्यातील नगरधन, आजनी, लाेहडाेंगरी, हाताेडी, नंदापुरी, हमलापुरी, चिचाळा येथील घरांवरील कवेलू व टिनपत्र्यांचे शेड उडाले हाेते.
....
महिलांची तारांबळ
वादळामुळे रामटेक व माैदा तालुक्यातील खात व परिसरातील काही गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला हाेता. काही गावांमधील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित हाेता तर काही गावात विजेचा लपंडाव सुरू हाेता. उन्हाळा असल्याने महिलांनी धान्य वाळवणे, वड्या, पापड, कुरुड्या, धापोडे, शेवया तयार करणे सुरू केले आहे. हे साहित्य छतावर अथवा अंगणात सुकवायला ठेवले जाते. ते पावसात भिजू नये म्हणून आवराआवर करताना महिलांची तारांबळ उडाली हाेती.