‘घोस्ट डॉक्टरां’च्या नावे चालविले जाते हेअर ट्रान्सप्लांट; डॉक्टर केवळ नावालाच

By सुमेध वाघमार | Published: September 7, 2022 12:12 PM2022-09-07T12:12:30+5:302022-09-07T12:15:07+5:30

नागपुरात बोगस हेअर ट्रान्सप्लांटचे रॅकेट!

Hair transplants carried out in the name of 'ghost doctors' | ‘घोस्ट डॉक्टरां’च्या नावे चालविले जाते हेअर ट्रान्सप्लांट; डॉक्टर केवळ नावालाच

‘घोस्ट डॉक्टरां’च्या नावे चालविले जाते हेअर ट्रान्सप्लांट; डॉक्टर केवळ नावालाच

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : अकाली टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फायदा घेत नागपूर शहरात बोगस हेअर ट्रान्सप्लांटचे रॅकेट सक्रिय झाले आहे. यातील काही सेंटर एखाद्या डॉक्टराचे नाव वापरून अटेन्डंटच हेअर ट्रान्सप्लांट करत आहेत. वैद्यकीय वर्तुळात अशा डॉक्टरांना ‘घोस्ट डॉक्टर’ किंवा ‘अदृश्य डॉक्टर’ असेही म्हणतात. शहरात १० ते १५ सेंटरमध्ये हे ‘घोस्ट डॉक्टर’ सेवा देत असल्याचे विदर्भ हेअर रिस्टोरेशन असोसिएशनचे म्हणणे आहे.

केस विरळ होणे, अकाली टक्कल पडण्याच्या समस्यांनी आजची युवा पिढी त्रस्त आहेत. मागील तीन ते चार वर्षांत केस गळतीवर उपचार घेणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेकजण वेळीच या समस्येकडे लक्ष देत नाही. परिणामी चाळिशीच्या आताच टक्कल पडण्यासारख्या गंभीर समस्येला त्यांना तोंड द्यावे लागते. अकाली टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास खच्चीकरण होत आहे, डिप्रेशनसारख्या अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.

केसगळतीचे प्रमाण कमी असल्यास औषधोपचार, पीआरपी व मिझोथेरपीने केसांची डेन्सिटी वाढविता येते; परंतु केस गळती अधिक असल्यास ‘हेअर ट्रान्सप्लांट’ हाच पर्याय आहे. परिणामी, नागपुरात बोगस हेअर ट्रान्सप्लांटचा व्यवसायाने जोर पकडला आहे. यात काही नागपूरसह बाहेरचे डॉक्टर आपल्या नावाचा वापर या बोगस सेंटरला करू देत असल्याचे पुढे आले आहे. यामुळे ट्रान्सप्लांट करणाऱ्यांच्या जीवाचा धोका अधिकच वाढला आहे.

- काय आहे ‘घोस्ट डॉक्टर’

एखाद्या डॉक्टराचे नाव वापरले जात असले तरी ते रुग्णांसमोर कधीच येत नाही; परंतु तेच उपचार करीत असल्याचे भासवले जाते. यालाच ‘घोस्ट डॉक्टर’ असे म्हणतात. एखाद्यावेळी कारवाई झाल्यास त्या डॉक्टराची पदवी पुढे केली जाते. या बदल्यात त्या डॉक्टरला प्रतिरुग्ण विशिष्ट रक्कम दिली जाते. हेअर ट्रान्सप्लांटच्यावेळी अटेन्डंटच असे डॉक्टरांचे नाव वापरत असल्याचे एका मोबाइलमधील संभाषणातून पुढे आले आहे.

नागपुरात असे १० ते १५ सेंटर

विदर्भ हेअर रिस्टोरेशन असोसिएशनने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, शहरात घोस्ट डॉक्टरांच्या नावे १० ते १५ सेंटर कार्यरत आहेत. यातील काही सेंटर चालविणारे अटेन्डंटच मालक आहेत. विशेष म्हणजे, कधी काळी ते प्रसिद्ध हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टरांच्या सेंटरमध्ये कामाला होते. त्यांची मदत करीत काम शिकून त्यांनी आपला बोगस हेअर ट्रान्सप्लांटचा व्यवसाय सुरू केला आहे.

‘आयएमए’कडे तक्रार करणार

विदर्भ हेअर रिस्टोरेशन असोसिएशनचे सदस्य व त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. संदीप अग्रवाल व डॉ. शशांक बनसोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘बोगस हेअर ट्रान्सप्लांट सेंटर’ला मदत करणाऱ्या घोस्ट डॉक्टरांची संख्या वाढत आहे. असोसिएशनच्या वतीने ‘आयएमए’कडे याची तक्रार केली जाईल. सोबतच ट्रान्सप्लांट करणाऱ्या प्रत्येकाने डॉक्टरांची डिग्री व ट्रान्सप्लांट करणारा डॉक्टरच असल्याचे तपासून घ्यावे. अन्यथा पैसे जातील, जीवही धोक्यात येईल.

Web Title: Hair transplants carried out in the name of 'ghost doctors'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.