हलबा समाज भाजपाला झटका देण्याच्या मूडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 09:28 PM2018-07-04T21:28:44+5:302018-07-04T21:32:28+5:30
हलबा समाजाबाबत शहर भाजपा चिंतित आहे. पक्षाचे नेते आपली मजबूत व्होट बँक वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा पेच कायम आहे. दरम्यान, माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांनी हलबा समाजाच्या समस्या सोडविण्यात भाजपाला अपयश आल्याचा ठपका ठेवत भाजपाचा राजीनामा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हलबा समाजाबाबत शहर भाजपा चिंतित आहे. पक्षाचे नेते आपली मजबूत व्होट बँक वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा पेच कायम आहे. दरम्यान, माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांनी हलबा समाजाच्या समस्या सोडविण्यात भाजपाला अपयश आल्याचा ठपका ठेवत भाजपाचा राजीनामा दिला आहे.
बाजीराव यांनी बुधवारी भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. बाजीराव यांनी सांगितले की, भाजपाने हलबा समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व जाती वैधता मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे समाजाला विविध योजनांचा फायदा मिळालेला नाही. दुसरीकडे एसटी प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळविणाऱ्यांची पदोन्नती होत आहे तर हलबा युवकांना नोकºया मिळेनाशा झाल्या असून अनेकांची असलेली नोकरी धोक्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूत गिरणी कामगारांना १४० दिवसांचा पगार, ग्रॅच्युईटी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तसे झाले नाही. भाजपा सरकार हलबा समाजावर अन्याय करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बाजीराव यांनी राजीनामा देण्यापूर्वी समाजातील काही नेत्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली. भाजपाचे मध्य नागपुरातील आमदार विकास कुंभारे यांनी देखील समाजाच्या संमेलनात भाजपाला हलबांच्या प्रश्नावरून इशारा दिला आहे. हलबा समाजाचे म्हणणे आहे की, भाजपाने त्यांना महापौरपद दिले. मात्र, जात प्रमाणपत्र नसल्यामुळे तीन महिन्यातच पद गमवावे लागले होते.
बाजीराव यांना पक्ष काढणारच होता : कुंभारे
आ. विकास कुंभारे म्हणाले, हलबा समाज भाजपासोबत आहे. समाजाला न्यायालयामार्फत न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा प्रयत्नरत आहे. आपण यासंबंधी कामासाठी सोमवारी दिल्ली येथे जात आहोत. डॉ. बाजीराव हे बऱ्याच दिवसांपासून सक्रिय नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला मदत केली होती. पक्ष त्यांच्यावर कारवाई करणारच होता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, असा दावा कुंभारे यांनी केला.