हल्दीरामची बनावट वेबसाइट : ग्राहकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 10:58 PM2021-05-08T22:58:15+5:302021-05-08T23:01:33+5:30
Haldiram's fake website हल्दीराम कंपनीची बनावट वेबसाइट तयार करून सायबर गुन्हेगाराने कंपनीची बदनामी करण्यासोबतच ग्राहकांचीही फसवणूक केली. सप्टेंबर २०२० ते ७ मे २०२१ पर्यंत हा प्रकार सुरू होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हल्दीराम कंपनीची बनावट वेबसाइट तयार करून सायबर गुन्हेगाराने कंपनीची बदनामी करण्यासोबतच ग्राहकांचीही फसवणूक केली. सप्टेंबर २०२० ते ७ मे २०२१ पर्यंत हा प्रकार सुरू होता. हल्दीराम फूड इंटरनॅशनल लिमिटेडचे संचालक श्रीनिवास राव (रा. सदाशिवनगर) यांनी कळमना पोलिसांकडे शुक्रवारी तक्रार नोंदविली. त्यानुसार अज्ञात आरोपीने सप्टेंबर २०२० मध्ये हल्दीरामची बनावट वेबसाइट तयार केली. त्यावर एक संपर्क क्रमांक देऊन कंपनीच्या नावे त्याने आर्थिक व्यवहार करून ग्राहकांची फसवणूक केली. त्यानंतर आरोपीने फेसबुकवर कंपनीची खोटी जाहिरातही प्रसारित केली. त्यामुळे कंपनीची बदनामी झाली. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर शुक्रवारी कंपनीतर्फे संचालक श्रीनिवास राव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
यापूर्वीही घडल्या घटना
गेल्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान अशाच प्रकारे सायबर गुन्हेगारांनी फूड कंपनी आणि घरपोच पार्सल सुविधा देणाऱ्या भोजनालयाच्या नावे बनावट वेबसाइट तयार करून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना उघड झाल्या होत्या.