कुलसचिवपदाच्या मुलाखतींना अर्धे उमेदवार गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:39+5:302021-07-07T04:09:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी घेण्यात येत असलेल्या मुलाखत प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी घेण्यात येत असलेल्या मुलाखत प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अर्धे उमेदवार गैरहजर होते. मंगळवारी उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती होणार असून, सायंकाळी नवीन कुलसचिवांचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे.
नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले. यात प्रामुख्याने कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, एआयसीटीईचे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अभय मुद्गल, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. अरविंद जोशी, भूषण महाजन, डॉ. श्याम कोरेटी इत्यादींचा समावेश आहे. अनेकांनी नियुक्तीसाठी राजकीय वजनदेखील वापरण्याचा प्रयत्न केला आहे.
मुलाखतीच्या पॅनेलमध्ये कुलगुरू, प्र-कुलगुरू, राज्यपालांचे नामनियुक्त सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, बाहेरील राज्यातून आलेले दोन विषयतज्ज्ञ यांच्यासह आठ सदस्यांचा समावेश आहे. मुलाखतींसाठी एकूण ३८ उमेदवार पात्र ठरले. पहिल्या दिवशी २० जणांच्या मुलाखती नियोजित होत्या. त्यापैकी १० उमेदवारच प्रत्यक्ष मुलाखतींना हजर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारीदेखील मुलाखती होणार असून, मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी कुलसचिवांच्या नावाची घोषणा होऊ शकते.