अर्ध्या शहर बसेसची चाके थांबली : नागपुरात वेतनासाठी चालक-वाहकांचा अचानक संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:16 PM2017-12-13T22:16:27+5:302017-12-13T22:19:44+5:30
महापालिकेने शहर बस वाहतुकीची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपविली आहे. यातील एका कंपनीच्या बस चालक व वाहकांनी बुधवारी अचानक संप पुकारल्याने महापालिकेच्या अर्ध्या बसेस उभ्या होत्या. यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महापालिकेने शहर बस वाहतुकीची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपविली आहे. यातील एका कंपनीच्या बस चालक व वाहकांनी बुधवारी अचानक संप पुकारल्याने महापालिकेच्या अर्ध्या बसेस उभ्या होत्या. यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. अनेक विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जाऊ शकले नाही. संप पुकारणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारीही संप सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
शहर बस वाहतुकीची तीन कंपन्यांवर जबाबदारी आहे. यातील आर.के.सिटी बसचे चालक-वाहक वेळेवर वेतन मिळत नसल्याने नाराज आहेत. १० डिसेंबरपर्यंत वेतन देण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. परंतु वेतन मिळाले नाही. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी संप पुकारला होता. परंतु दुपारनंतर कामावर परतले. मात्र वेतन न मिळाल्यास संपावर जाण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. संपामुळे खापरखेडा, कामठी, कन्हान, खरबी, पन्नासे ले-आऊ ट आदी भागातून सुटणाऱ्या बसेस उभ्या होत्या.
कंपनीने दुपारनंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा केले. परंतु कामावरून कमी केलेले चालक भाऊ राव रेवतकर यांना कामावर घेण्यास नकार दिला. यामुळे कामगार सेनेचे संघटक प्रशांत मोहिते यांनी गुरुवारी संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
संपावर न जाण्याचा पोलिसांचा सल्ला
विधिमंडळाचे सुरू असलेले हिवाळी अधिवेशन विचारात घेता, बस कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, असा सल्ला धंतोली पोलिसांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. संपाची माहिती देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी धंतोली पोलीस स्टेशनला गेले असता पोलीस निरीक्षक सीमा मेहंदळे यांनी हा सल्ला दिला, सोबतच अचानक संप पुकारल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.