अर्ध्या शहरातील कचरा संकलन ठप्प()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:53+5:302021-01-17T04:07:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ११३ सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याने महापालिकेच्या सहा झोनमधील कचरा संकलनाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ११३ सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याने महापालिकेच्या सहा झोनमधील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. यामुळे झोन ६ ते १० मधील कचरा संकलन कोलमडले. घराघरांतून कचरा संकलन झाले नाही. रस्त्यावर काही ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना उचलावे लागले.
नागपूर शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांकडे आहे. यातील गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी अशा
झोनची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे आहे, तर झोन क्रमांक १ ते ५ चे कचरा व्यवस्थापन एजी एन्व्हायरो कंपनीकडे आहे. या दोन्ही कंपन्यांकडे जवळपास दोन हजार सफाई कर्मचारी आहे. यात बीव्हीजी कंपनीकडे ९०० कर्मचारी आहेत. यातील ११३ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याची नोटीस कंपनी व्यवस्थापनाने बजावली आहे. यामुळे संतप्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. परिणामी अर्ध्या शहरातील कचरा संकलन ठप्प होते. सायंकाळपर्यंत या संपावर तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे रविवारी कचरा संकलन ठप्प राहण्याची शक्यता आहे.
.........
मनपाने बजावली कंपनीला नोटीस
बीव्हीजी कंपनीच्या व्यवस्थापनाने ११३ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यासंदर्भात नोटीस बजावल्याने झोन क्रमांक ६ ते १० मधील कचरा संकलन शनिवारी बंद होते. मनपा कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांवरील कचरा उचलण्यात आला. शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी कंत्राटदारांची आहे. त्यामुळे बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावली असून, यावर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. कचरा संकलन ठप्प असल्याने करारानुसार कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त (घनकचरा), मनपा