नागपुरात पावसाचा अर्धा काेटा जुलैमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:08 AM2021-07-25T04:08:16+5:302021-07-25T04:08:16+5:30
नागपूर : जुलैच्या मध्यापर्यंत पावसाळी ढगांनी दडी मारल्याने पावसाचा बॅकलाॅग वाढताे की काय, अशी भीती वाटत हाेती. मात्र गेल्या ...
नागपूर : जुलैच्या मध्यापर्यंत पावसाळी ढगांनी दडी मारल्याने पावसाचा बॅकलाॅग वाढताे की काय, अशी भीती वाटत हाेती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या वरुणराजाच्या कृपादृष्टीने माेठा दिलासा मिळाला. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत सामान्यपेक्षा ११५.३ टक्के अधिक पाऊस झाला असून हंगामाचा अर्धा काेटा पूर्ण झाला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेल्या आकड्यानुसार जून ते सप्टेंबरदरम्यान हाेणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत ५०.३६ टक्के पाऊस झाला आहे. जून ते २४ जुलैपर्यंत नागपूर जिल्ह्यात ४६३.५ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. या काळात सरासरी ४०२ मिमी पाऊस नाेंदविला जाताे. गेल्या वर्षी जिल्ह्यात या काळात सामान्यच्या तुलनेत १०४.४८ टक्के अधिक म्हणजे ४२० मिमी पाऊस झाला हाेता. जिल्ह्यात पावसाच्या पूर्ण हंगामात सरासरी ९२०.४ मिमी पावसाची नाेंद केली जाते. जून महिन्यात सरासरी १६६.३ मिमी पाऊस हाेताे. यावर्षी मात्र २००.९ मिमी पाऊस झाला, जाे १२०.८१ टक्के आहे. जुलै महिन्यात २४ तारखेपर्यंत २३५.७ मिमी पाऊस हाेताे पण यावर्षी २६२.६ मिमी पावसाची नाेंद झाली, जी १११.४ टक्के आहे.
ढगाळ वातावरणात हलकी रिमझिम
शनिवारी आकाशात दिवसभर काळे ढग दाटले हाेते. थांबून थांबून पावसाची रिमझिम हाेत हाेती, मात्र जाेराच्या सरी काेसळल्या नाही. पाऊस थांबल्याने तापमानात १.६ अंशाची वाढ झाली व ते २९ अंश नाेंदविण्यात आले. मात्र सामान्यपेक्षा २ अंश कमी तापमान असल्याने उष्णतेची जाणीव झाली नाही. सकाळपर्यंत ९५ टक्के असलेली आर्द्रता सायंकाळी ८८ टक्केपर्यंत घटली.