‘हाफकिन’कडून औषधपुरवठा सहा महिन्यात सुरळीत : संजय मुखर्जी यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:36 PM2019-08-23T23:36:35+5:302019-08-23T23:37:50+5:30
‘हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉपोरेशन लि.’मुळे औषधी, यंत्र सामूग्री खेरीदीत पारदर्शकता आली आहे. पुढील सहा महिन्यात या कंपनीकडून औषधांसह यंत्र सामूग्री पुरवठाही सुरळीत होईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉपोरेशन लि.’मुळे औषधी, यंत्र सामूग्री खेरीदीत पारदर्शकता आली आहे. पुढील सहा महिन्यात या कंपनीकडून औषधांसह यंत्र सामूग्री पुरवठाही सुरळीत होईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. ते म्हणाले, या सोबतच ‘अॅण्टी रेबीज’, ‘अॅण्टी स्नेक व्हेनम’, ‘हिमोफेलिया’ या आजाराचा औषधांसह इतरही महत्त्वाच्या औषधी निर्माण करण्याच्या कार्याला गती देण्यात येईल.
‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अॅल्युमनाय असोसिएशन, नागपूर’तर्फे आयोजित ‘डायमंड ज्युबली गोल्ड मेडल अवॉर्ड’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. मुखर्जी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. मुखर्जी म्हणाले, ‘हाफकिन’मध्ये सुरूवातील अनेक समस्या होत्या, परंतु आता त्या सोडविण्यात आल्या आहेत. औषधांचा तुटवडा जाणार नाही याची दखल घेतली जाणार आहे.
नव्या महाविद्यालयांमुळे डॉक्टरांची संख्या वाढणार
डॉ. मुखर्जी म्हणाल्या, राज्यात सिंधुदूर्ग, नंदूरबार, सातारा, परभणी, अमरावती, नाशिक व बुलढाणा या सात ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह तीन खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही महाविद्यालये सुरू होतील. यामुळे डॉक्टरांची संख्या वाढून रुग्णसेवेत मदत होईल.
‘सिकलसेल सेंटर’बाबत लवकरच सामंजस्य करार
डॉ. मुखर्जी म्हणाले, मेडिकलमध्ये होऊ घातलेले ‘द सेंटर ऑफ एक्सलन्स इन सिकलसेल सेंटर’बाबत शासन सकारात्मक आहे. मेहता फाऊंडेशनने या ‘सेंटर’साठी निधी उभा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच या संदर्भातील सामंजस्य करार (एमओयू) केला जाईल.
गरज डॉक्टर-रुग्णांच्या सुसंवादाची
पूर्वी डॉक्टरांवर हल्ले कमी व्हायचे, परंतु अलिकडे वाढले आहेत. यामागील कारणे म्हणजे, डॉक्टर आणि रु ग्ण यांचे नाते दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील बदलते प्रवाह, रुग्णांची वाढलेली समज आणि संख्या अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. यावर उपाय म्हणून डॉक्टर-रुग्णांमध्ये संवाद वाढविण्याची गरज आहे. विशेषत: वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना रुग्णांचे कसे समुपदेशन करावे हे शिकविणे आवश्यक झाले आहे. ‘अॅल्युमनाय असोसिएशन’ने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. मुखर्जी यांनी केले.