ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात ‘हल्लाबोल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:11 PM2019-01-08T23:11:58+5:302019-01-08T23:13:47+5:30
‘ऑनलाईन’ औषध विक्री विरोधात मंगळवारी देशभरातील केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने विरोध दर्शविला. नागपुरात डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कावडकर यांच्या नेतृत्वात ‘हल्लाबोल’ आंदोलन करीत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील आणि अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रकाश शेंडे यांना निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘ऑनलाईन’ औषध विक्री विरोधात मंगळवारी देशभरातील केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने विरोध दर्शविला. नागपुरात डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कावडकर यांच्या नेतृत्वात ‘हल्लाबोल’ आंदोलन करीत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील आणि अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रकाश शेंडे यांना निवेदन सादर केले.
संघटनेच्या मते, काही दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने ‘ऑनलाईन’ औषध विक्रीबाबत ठोस नियम लागू होत नाहीत, तोपर्यंत त्यावर घालण्यात आलेली बंदी कायम राहील, असा आदेश दिला होता. पण, अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. ऑनलाईन औषधविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या कोणतेही नियम अस्तित्वात नाहीत. यामुळे आजघडीला देशात सुरू असलेली औषधांची ऑनलाईन विक्री अवैध आहे, असा दावाही केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केला आहे. ‘ऑनलाईन फार्मसी’च्या माध्यमातून देशभरात बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू आहे. याद्वारे झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या यासारख्या अनेक धोकादायक औषधांची विक्री सुरू असल्याचे प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आले आहे. मात्र, प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचेदेखील पालन करण्यात येत नसल्याबाबत संघटनेने आश्चर्य व्यक्त केले आहे.
‘लोकमत’शी बोलताना कावडकर म्हणाले, ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात २८ सप्टेंबर २०१८ रोजी एकदिवसीय बंद पाळण्यात आला. याच्या चार महिन्यातच हल्लाबोल आंदोलन केले. परंतु यावेळी रुग्णांना फटका बसू नये, यासाठी औषधालये सुरू ठेवण्यात आली. असोसिएशनच्या मागण्यांचे निवेदन जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) देण्यात आले. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य औषधी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य हरीश गणेशानी, जिल्हा सचिव हेतल ठक्कर, जिल्हा पदाधिकारी शैलेश गहलोद, वीरभान केवलरामानी, धनंजय जोशी, सतीश देऊळकर, राजू खंडेलवाल, अविनाश राव, श्रीकांत मुडे, प्रकाशचंद्र रणदिवे, अशोक ठाकरे, अनिल अप्पा, दत्ता खाडे, विशाल दत्ता, बाळू गोरले, शैलेश वैरागडे, राजू बाळसराफ, लतीफ बराडे, मनोज केडिया, अबरार खान, विशाल मानापुरे, शैलेश अग्रवाल, अशिफाक खान, निकुंज शाहू, अजय रुशिया, नीलेश त्रिवेदी, अभिजित हुद्दार, रिजवान शेख, जितेंद्र मोटघरे, मिहीर नायक, कमलेश भोयर, दीपक घोडमारे व केमिस्ट प्रतिनिधी सहभागी होते.