नागपुरात मसोबा, नागोबा मंदिरावर अतिक्रमणविरोधी पथकाचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:26 PM2017-12-04T23:26:21+5:302017-12-04T23:33:35+5:30
रहदारीच्या व वर्दळीच्या भागात, तसेच फूटपाथवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार सोमवारी महाल भागातील चिटणवीस वाड्यामागे असलेले मसोबा मंदिर व झेंडा चौक रोडवरील नागोबा मंदिरावर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हातोडा चालविला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : रहदारीच्या व वर्दळीच्या भागात, तसेच फूटपाथवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार सोमवारी महाल भागातील चिटणवीस वाड्यामागे असलेले मसोबा मंदिर व झेंडा चौक रोडवरील नागोबा मंदिरावर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हातोडा चालविला.
मसोबा मंदिर १९८५ साली बांधण्यात आले होते. ६४ चौ.फूट जागेत उभारण्यात आलेल्या या मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्यात आला होता. परंतु या मंदिरामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अतिक्रमणविरोधी पथकाने सकाळी ११.३० च्या सुमारास मसोबा मंदिरात पूजाअर्चना करून मंदिराचे बांधकाम हटविले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
त्यानंतर पथकाने दुपारी १२.३० च्या सुमारास महाल भागातील झेंडा चौक रोडवरील नागोबा मंदिर हटविले. १९८० मध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. २५ चौ. फू ट जागेत मंदिर उभारण्यात आले होते. दोन्ही मंदिरातील मूर्ती महापालिकेच्या पथकाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. काही दिवसापूर्वी लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने व्हीएनआयटी प्रवेशद्वाराजळील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले. तसेच धरमपेठ झोनने बोले पेट्रोल पंपाजवळील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
शहराच्या विविध भागात अतिक्रमण करून उभारण्यात आलेलेली धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली. गेल्यावर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. शहरातील काही अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. मंदिर, चबुतरे, ओटे, फलक आदी हटविण्यात आले होते. मिठानीम दर्ग्यासमोरील रस्ता दुभाजकावरील भाग मोकळा करण्यात आला होता़. वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविणार असल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने न्यायालयात सादर केले होते़ त्यानुसार अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे पाडली जात आहेत.
अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन अधीक्षक यादव जांभूळकर, निरीक्षक संजय कांबळे, पथक प्रमुख प्रकाश पाटील, मोहरीर संजय शिंगणे यांच्यासह पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.