नागपुरातील मेयो रुग्णालयालगतच्या अवैध घरांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 11:57 PM2018-04-23T23:57:21+5:302018-04-23T23:57:33+5:30
इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महिविद्यालयाच्या (मेयो) सुरक्षा भिंतीलगत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या घरावर महापालिके च्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविला. कारवाईला विरोध करण्यासाठी महिला जेसीबीच्या पुढे आल्या होत्या. परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महिविद्यालयाच्या (मेयो) सुरक्षा भिंतीलगत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या घरावर महापालिके च्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविला. कारवाईला विरोध करण्यासाठी महिला जेसीबीच्या पुढे आल्या होत्या. परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटविण्यात आले.
रुग्णालयाच्या भिंतीच्या बाजूला तीन फूट जागा मोकळी सोडण्यात आली होती. परंतु लगतच्या नागरिकांनी या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले. अतिक्रमणासंदर्भात २००२ मध्ये प्रकरण न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २०१७ मध्ये मेयोसमोरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ६ मार्चला कारवाई करून २० घरांचे अतिक्रमण हटविले होते. उर्वरित नागरिकांना अतिक्रमण हटविण्यास सांगितले होते. परंतु नागरिकांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील व अधीक्षक यादव जांभुळकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या परिसरात अनेकांचे तीन मजल्याचे अवैध बांधकाम जेसीबी मशीनद्वारे पाडण्यात आले. याला परिसरातील नागरिकांनी प्रचंड विरोध केला. मात्र, कारवाईदरम्यान १४० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा उपस्थित असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यामध्ये मो. इब्राहिम, मेहफज पटेल, मो. मुजफ्फर, झियाउद्दीन असगर, मो. असलम, जिमल मो. शकील, मो. अयाज, मो. वहील, मो. शकील, मो. अशफाक, मो. साबीर, मो. इब्राहिम, मो. मुस्ताक आदी लोकांवर कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान गोंधळ घालणाऱ्यांनी अतिक्रमण हटविताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला. काही जणांचे अतिक्रमण असूनही कारवाई करण्यात आलेली नाही तर काहींचे बांधकाम हटविण्यात आले.
यावेळी मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. सागर पांडे, अतिक्रमण विभागाचे शाह, जमशेद अली, नितीन मंथनवार, संजय शिंगणे, शरद इरपाते, पोलीस विभागाचे अधिकारी राजरत्न बन्सोड, वैभव जाधव आदी उपस्थित होते.
वेळ देऊनही अतिक्रमण काढले नाही
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १३ जानेवारी २०१७ रोजी मेयो रुग्णालयालगतचे अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ६ मार्च २०१६ रोजी कारवाई करण्यात आली होती. परंतु काही नागरिकांनी स्वत: अतिक्रमण हटविण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्यांनी अवैध बांधकाम न हटविल्याने कारवाई करावी लागली, अशी माहिती मेयो रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. सागर पांडे यांनी दिली.