नागपुरात अवैध धार्मिक स्थळे व अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:29 PM2017-12-01T22:29:53+5:302017-12-01T22:37:09+5:30
रहदारीच्या व वर्दळीच्या भागात, तसेच फूटपाथवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले होते़ अशाच स्वरुपाचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार अवैध धार्मिक स्थळ हटविण्याची मोहीम सुरू केली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : रहदारीच्या व वर्दळीच्या भागात, तसेच फूटपाथवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले होते़ अशाच स्वरुपाचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार अवैध धार्मिक स्थळ हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. व्हीएनआयटी प्रवेशद्वाराजवळील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले. दुसऱ्या दिवशी धरमपेठ झोनने बोले पेट्रोल पंपाजवळील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले. सोमवारपासून शहराच्या विविध भागात अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धाार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविला जाणार आहे. सोबतच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील अतिक्रमणाचा सफाया केला जात आहे.
गेल्यावर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. शहरातील काही अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. मंदिर, चबुतरे, ओटे, फलक आदी हटविण्यात आले होते. मिठानीम दर्गासमोरील रस्ता दुभाजकावरील भाग मोकळा करण्यात आला होता़. वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविणार असल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने न्यायालयात सादर केले होते़ न्यायालयाच्या आदेशानंतर अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालविला़ मात्र कारवाईला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता़ यामुळे मोहीम थांबविण्यात आली होती.
दरम्यान राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याबाबतचे निर्देश दिले होते. परंतु काही धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणासाठी प्रयत्न सुरू झाल्याने शहरातील सर्व धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली. यासाठी दहा महिने लागले़ तसेच महापालिका निवडणुका झाल्यामुळे प्रक्रियेला विलंब लागला़ आता सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळावंर कारवाईला सुरुवात झाली आहे. सोमवारपासून व्यापक प्रमाणात कारवाई केली जाणार आहे.
नागपूर शहरात १,५७६ अनधिकृत धार्मिकस्थळे शहरात २००९ पूवीर्ची १ हजार ५२१ व २००९ नंतरची ५५ अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याची मनपात नोंद आहे़ यातील १७ अतिप्राचीन स्थळांचा समावेश ‘अ’ श्रेणीत असल्यामुळे त्यांना नियमित करण्यात आले़ मंगळवारी झोनमधील दोन धार्मिक स्थळांचे स्थलांतरण करण्यात आले़ १७५ धार्मिक स्थळे १ मे १९६० पूवीर्ची आहेत़ दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली.