लॉकडाऊनमध्ये दोन मजली इमारतीवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:29+5:302021-03-19T04:09:29+5:30
नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कोरोना संक्रमण असताना गुरुवारी सीताबर्डी, तेलीपुरा येथील एका जीर्ण दोन मजली इमारतीवर हातोडा ...
नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कोरोना संक्रमण असताना गुरुवारी सीताबर्डी, तेलीपुरा येथील एका जीर्ण दोन मजली इमारतीवर हातोडा चालविला. वास्तविक अतिक्रमण पथकातील काही कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत, अशाही परिस्थितीत प्रवर्तन विभागातील तीन पथकातील सुमारे ३० कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.
या कारवाईसंदर्भात परिसरात उलटसुलट चर्चा आहे. या इमारतीत काही भाडेकरू आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन असताना दाट वस्तीच्या भागात इमारत पाडण्यासाठी तत्परता दाखविण्यात आली. ही कारवाई दुपारी १२ ते ३ दरम्यान चालली. इमारतीची पॅराफिट भिंत व खोल्यांच्या भिंती तोडण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे भाजीपाला, फळे व किराणा दुकानांना दुपारी १ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. दुसरीकडे पथकाला अतिक्रमण कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
....
कर्मचारी दहशतीत
मिळालेल्या माहितीनुसार अतिक्रमणविरोधी पथकातील चार कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर हे कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये आहेत. अतिक्रमण कारवाईदरम्यान लोकांची गर्दी होते. त्यामुळे संक्रमणाचा धोका असल्याने कर्मचारी दहशतीत काम करत आहेत.