स्पाईस जेटला ग्राहक मंचचा दणका : ५५ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:09 PM2019-01-31T22:09:58+5:302019-01-31T22:11:41+5:30
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दोन ग्राहकांची तक्रार अंशत: मंजूर करून त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५० हजार आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार अशी एकूण ५५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश स्पाईस जेट या विमान सेवा कंपनीला दिला. त्यामुळे कंपनीला जोरदार दणका बसला. या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दोन ग्राहकांची तक्रार अंशत: मंजूर करून त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५० हजार आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार अशी एकूण ५५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश स्पाईस जेट या विमान सेवा कंपनीला दिला. त्यामुळे कंपनीला जोरदार दणका बसला. या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे व दीप्ती बोबडे यांनी हा निर्णय दिला. रसिक व मिनौती नशिने अशी ग्राहकांची नावे असून ते गांधीनगर येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, या ग्राहकांनी १ ते १० एप्रिल २०१६ पर्यंत भारताच्या उत्तर-पूर्व भागात पर्यटनासाठी जायचे ठरवले होते. बागडोगरा ते कोलकाता व कोलकाता ते नागपूर असा त्यांचा परतीचा प्रवास होता. त्याकरिता त्यांनी स्पाईस जेट कंपनीची तिकिटे खरेदी केली होती. त्यावेळी त्यांना कंपनीची विमाने वेळेवर उडत असल्याची माहिती देण्यात आली होती. ते १० एप्रिल २०१६ रोजी बागडोगरा विमानतळावर गेले असता विमानाला विलंब होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना कोलकाता येथे ५ तास ४० मिनिटे विलंबाने पोहोचविण्यात आले. परिणामी, ते कोलकाता-नागपूर विमान पकडू शकले नाही. त्यांना कोलकाता येथे हॉटेलमध्ये राहण्याचा व भोजनाचा अतिरिक्त खर्च सोसावा लागला. तसेच, नागपूरला परतण्यासाठी नवीन तिकिटे खरेदी करावी लागली. याची भरपाई मिळावी म्हणून त्यांनी स्पाईस जेट कंपनीला पत्र लिहिले होते, पण त्याचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्त्यांतर्फे अॅड. सुरेंद्र खरबडे यांनी बाजू मांडली.
कंपनीने उदासीनता दाखवली
विमान रद्द झाल्यास किंवा विलंब होत असल्यास प्रवाशांना योग्य माहिती देण्याचे व त्यांची योग्य सोय करण्याचे निर्देश डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एविएशन यांनी जारी केले आहेत. परंतु, स्पाईस जेट कंपनीने त्याचे पालन केले नाही. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी पाठविलेल्या पत्राला उत्तरही दिले नाही. त्यावरून कंपनीची उदासीनता स्पष्ट होते असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदविले.