पश्चिम नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:22 PM2018-07-27T22:22:52+5:302018-07-27T22:24:44+5:30
उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करीत नासुप्रने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. शुक्रवारी पश्चिम नागपुरातील नऊ अनधिकृत धार्मिकस्थळे जमीनदोस्त करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करीत नासुप्रने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. शुक्रवारी पश्चिम नागपुरातील नऊ अनधिकृत धार्मिकस्थळे जमीनदोस्त करण्यात आली.
नासुप्र सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशाप्रमाणे व अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व निमशासकीय, सार्वजनिक जागांवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही नासुप्रच्या पश्चिम विभागाद्वारे करण्यात आली. पथकाने सोनेगांव आणि राणाप्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गजानन नगरातील हनुमान मंदिर, आंबेडकर नगरातील विश्वशांती बुद्धविहार, बंधू गृहनिर्माण संस्थेतील मंदिर, डंबारे ले-आऊटमधील शितला माता मंदिर, मनोहर विहारमधील माता मंदिर, प्रज्ञानगरमधील शिव मंदिर, हावरे ले-आऊटमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवनगर, खामला येथील दुर्गा मंदिर, कॉस्मोपॉलीटन सोसायटीमधील देवी मंदिर, बोरकुटे ले-आऊटमधील जय अंबे मंदिर, श्री कॉम्प्लेक्स मंदिराचे अतिक्रमण काढण्यात आले. यापैकी एक अतिक्रमण हे नझूलच्या जागेवरचे असून ते काढण्याकरिता नासुप्रच्या क्षतिपथकाने नझूल विभागाची मदत केली. स्थानिक नागरिकांनी नासुप्रच्या व नझूलच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत अतिक्रमण काढण्यात आले. ही कार्यवाही विभागीय अधिकारी आंभोरकर, कार्यकारी अभियंता प्रमोद धनकर, पुर्जेकर, वासनिक, जांभूळकर, नझूल विभागाचे देठे, नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील व राणाप्रताप नगर व सोनेगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पाडली.