भागवत व ओवेसी यांचे हातात हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2016 03:19 AM2016-04-02T03:19:41+5:302016-04-02T03:19:41+5:30

‘भारत माता की जय’ म्हणू नका असे कुराणमध्ये कुठेच लिहिलेले नाही. सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे हातात हात घालून काम सुरू आहे.

Hand in the hands of Bhagwat and Owaisi | भागवत व ओवेसी यांचे हातात हात

भागवत व ओवेसी यांचे हातात हात

Next

दिग्विजयसिंह यांची टीका : पीडीपीची साथ भाजपला कशी चालते ?
नागपूर : ‘भारत माता की जय’ म्हणू नका असे कुराणमध्ये कुठेच लिहिलेले नाही. सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे हातात हात घालून काम सुरू आहे. या दोघांचीही ‘फूट पाडा व राज्य’ करा अशी कट्टरवादी विचारधारा आहे. काँग्रेसने तर ‘भारत माता की जय’ या नाऱ्यावर देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कवरी आॅफ इंडिया’ मध्ये भारत ‘माता की जय’ची केलेली व्याख्या संघ व भाजपला समजविण्याची वेळ आली आहे, असा चिमटा अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी काढला.
पक्षाच्या आढावा बैठकीसाठी नागपुरात आले असता सिंह यांनी भाजप व संघ परिवारावर सडकून टीका केली. सिंह म्हणाले, जेएनयूमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारे दिले नसतानाही केवळ साम्यवादी विचाराचा असल्यामुळे कन्हैया कुमारला अटक करण्यात आली. मात्र, संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूचे समर्थन करणाऱ्या पीडीपीला जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनविण्यासाठी भाजप कशी काय साथ देत आहे, हे भागवत यांनी स्पष्ट करावे. संविधान व आरक्षणाचा विरोध करणारी भाजपा आता डॉ. आंबेडकरांना आपलेसे करू पाहत आहे. एकीकडे भागवत म्हणतात की आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात आरक्षण लागू राहील. त्यामुळे कोण खरे बोलत आहे, हे या नेत्यांनी आधी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसचे टार्गेट मोहन भागवत नसून संघाची विचारधारा आहे. भागवत यांच्याशी आपली कुठलीही व्यक्तिगत लढाई नाही. मात्र, हिंसा, द्वेष पसरविणाऱ्या विचारधारेला आपला विरोध सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये भाजपने पक्षांतरबंदी कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. स्वत:कडे बहुमत असल्याचा दावा भाजपने केला, मात्र ते सिद्ध न करता राष्ट्रपती राजवट लागू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हटल्याने देश काँग्रेसमुक्त होणार नाही. भाजपमध्ये हिंमत असेल तर उत्तराखंडमध्ये निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.(प्रतिनिधी)

फडणवीसांवरील आरोपांवर ठाम
महाराष्ट्राच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) चे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या वरळी शाखेतच बँक खाती उघडण्याचा आदेश जारी केला होता. यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंह यांना नोटीस बजावली होती. यावर बोलताना सिंह यांनी आपण आरोपांवर ठाम असल्याचे सांगितले. मी नोटीसीला उत्तर देत नाही. न्यायालयात उत्तर देईल. गडकरींनीही यापूर्वी नोटीस दिली होती. कायदेशीर लढाई लढतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपणही दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलो आहे. फडणवीस यांनी अशी कामे करू नयेत, नाहीतर ते फसतील, असा सल्लावजा टोला त्यांनी लगावला.

Web Title: Hand in the hands of Bhagwat and Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.