महाबोधी महाविहाराचे संचालन बौध्दांच्या ताब्यात द्या, भदंत ससाई यांचे पीएम मोदींना निवेदन

By आनंद डेकाटे | Updated: March 30, 2025 19:39 IST2025-03-30T19:37:26+5:302025-03-30T19:39:02+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दीक्षाभूमीला भेट

Hand over the management of Mahabodhi Mahavihara to Buddhists, Bhadant Sasai's appeal to PM Modi | महाबोधी महाविहाराचे संचालन बौध्दांच्या ताब्यात द्या, भदंत ससाई यांचे पीएम मोदींना निवेदन

महाबोधी महाविहाराचे संचालन बौध्दांच्या ताब्यात द्या, भदंत ससाई यांचे पीएम मोदींना निवेदन

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तथागत गौतम बुध्दाच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. तसेच बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती सोपवा आणि दीक्षाभूमीसाठी अतिरीक्त जागा देण्यात यावी, या आशयाचे निवेदन दिले.

पंतप्रधान मोदी सकाळी ९.३० वाजता दीक्षाभूमीत पोहोचले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशावर पुष्प वाहिले आणि वंदन केले. त्यानंतर तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ससाई यांनी त्रिशरण पंचशील म्हटले. यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे अध्यक्ष भदंत सुरेई ससाई यांनी पंतप्रधान मोदी यांना शाल, आणि सोनेरी रंगात कोरलेली दीक्षाभूमी स्तुपाची प्रतिकृती भेट देवून त्यांचे स्वागत केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथ भेट दिले.

निवेदनात म्हटले की, बोधगया हे जगातील सर्व बौद्धांचे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली होती. या महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती. तेथील १९४९ बीटी ॲक्ट रद्द करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावे. तसेच दीक्षाभूमीत येणाऱ्या अनुयायांसाठी जागा अपूरी पडत आहे. भविष्याचा विचार करता माता कचेरी, कॉटन रिसर्च सेंटर येथील २१ एकर जागा दीक्षाभूमीला देण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे विनंती केली.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, स्मारक समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, एड. आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, दादाराव दाभाडे उपस्थित होते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार देशाला विकासाकडे नेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीतील नोंदवहीत आपला संदेश लिहिला. त्यात त्यांनी लिहिले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूर स्थित दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य लाभल्याने मी भारावून गेलो आहे. या पवित्र स्थळाच्या वातावरणात बाबासाहेबांच्या सामाजिक समता, समानता आणि न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव येतो. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंसाठी समान हक्क आणि न्यायाच्या व्यवस्थेसह पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करते. मला पूर्ण विश्वास आहे की या अमृत काळात आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा मार्ग अनुसरून देशाला प्रगतीच्या नवीन शिखरावर नेऊ. एक विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवणे हीच बाबासाहेबांना आपली खरी आदरांजली ठरेल.                                                                                                      

पुष्पवर्षावाने स्वागत

दीक्षाभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. चारही बाजूंनी रस्ता बंद करण्यात आला होता. असे असतानाही चौकांमध्ये नागरिक पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जमले होते. पंतप्रधानांचा ताफा येताच नागरिकांनी पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनीही नागरिकांना हात दाखवून त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला.

- दीक्षाभूमीला दुसऱ्यांदा भेट देणारे एकमेव पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला दुसऱ्यांदा भेट दिली. यापूर्वी १४ एप्रिल २०१७ साली त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. दीक्षाभूमीला दोनदा भेट देणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. पहिल्यांदा त्यांनी भेट दिली तेव्हा दीक्षाभूमीवर ध्यानसाधनाही केली होती. त्यामुळे स्मारक समितीने या वेळीसुद्धा तशी व्यवस्था केली होती. परंतु या वेळी मात्र त्यांनी ध्यान केले नाही. बुद्धवंदना मात्र ग्रहण केली.

Web Title: Hand over the management of Mahabodhi Mahavihara to Buddhists, Bhadant Sasai's appeal to PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.