संघातील 'त्या' हातामुळेच आज सलामासाठी उठतात हात; मुख्यमंत्र्यांचं RSSला श्रेय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 04:09 PM2019-01-04T16:09:38+5:302019-01-04T16:19:08+5:30
संघाच्या शाखेत मी वयाच्या सातव्या वर्षापासून जात होतो. चार ते पाच वर्षांच्या असताना संघाच्या विजयादशमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शाखेत जायचो, संघाचा गणवेश मी परिधान करायचो.
नागपूरः संघाच्या शाखेत मी वयाच्या सातव्या वर्षापासून जात होतो. चार ते पाच वर्षांच्या असताना संघाच्या विजयादशमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शाखेत जायचो, संघाचा गणवेश मी परिधान करायचो. घरासमोरच शाखा भरायची, संघासमोर नतमस्तक झालेल्या या हातांमुळेच चांगले संस्कार मिळाले आणि समाजासोबत जगायला शिकलो. त्याचाच फायदा जीवनात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते. हिंदुत्व हे संकुचित असू शकत नाही. ज्या दिवशी ते संकुचित होतं तेव्हा ते हिंदुत्व राहत नाही. चर्चमध्ये वा मस्जिदमध्ये गेलो तिथे मला माझा देवच दिसतो. मी लहानपणापासूनच हेच शिकलो. भारतीय जीवनपद्धतीला नाकारण्याचा जिथे प्रयत्न होतो तिथे हिंदुत्व जागृत करावं लागतं. जिथे जीवनपद्धतीला नाकारलं जात नाही, तिथं सहिष्णुतेनं इतर जीवन पद्धतींना सन्मानाने स्वीकारणं हे हिंदुत्व आहे.
राजकारणात काम करत असताना समाजात काम करण्याची वृत्ती जागी झाली. त्यामुळेच हा जो हात आहे तो घेण्याची संधी देखील प्राप्त झाली आहे. विरोधी पक्षात काम करत असताना संकल्पना मांडत असतो. परंतु सत्ता पक्षात गेल्यानंतर त्या संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र यंत्रणेकडून म्हणावी तशी गती मिळाली नाही. यंत्रणा साथ देत नव्हती. 2014च्या निवडणुकीतही मी एक व्हिजन डॉक्युमेंट केलं होतं. तसा एक कार्यक्रमदेखील मी केला होता. ते व्हिजन डॉक्युमेंट कसं सत्यात उतरवता येईल, याचाही मी विचार केलेला होता. त्यावेळेस मांडलेली गोष्ट पूर्ण केली आहे.
मागील 4 वर्षांत प्रशासनावरील पकड मजबूत झाली आणि त्रास सहन करण्याची क्षमतादेखील वाढली. नोकरशाहीतील 50 टक्के आरक्षण दिलं जातं. सरकारी नोकऱ्यांपेक्षा खासगी क्षेत्रात जास्त संधी आहेत. आरक्षण मिळाले तरी नोकऱ्यांत फारसा फायदा नाही. आरक्षणामुळे मनाचे समाधान होते. पुढील 5 ते 10 वर्षांत आरक्षणाचे महत्व व माहात्म्य कमी होईल. सामाजिक आरक्षण बाजूला सारून आर्थिक आरक्षणाकडे जाण्याची वेळ अद्याप आलेली नाही. सर्वच समाजात संकुचित मानसिकता वाढणे हा चिंतेचा विषय आहे.