हातमाग उद्योग नामशेष होतोय; उत्पादनाला मागणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 08:00 AM2021-10-13T08:00:00+5:302021-10-13T08:00:11+5:30
Nagpur News विविधतेने नटलेल्या भारतामध्ये एकेकाळी हातमाग हा आघाडीचा उद्योग होता. परंतु, काळाच्या ओघात हा उद्योग नामशेष होत आहे. ही कला आता मोजक्याच विणकरांमुळे जिवंत आहे.
अंकिता देशकर
नागपूर : विविधतेने नटलेल्या भारतामध्ये एकेकाळी हातमाग हा आघाडीचा उद्योग होता. परंतु, काळाच्या ओघात हा उद्योग नामशेष होत आहे. ही कला आता मोजक्याच विणकरांमुळे जिवंत आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये मोमीनपुरा हा परिसर हातमाग उद्योगाचे प्रमुख केंद्र होता. या भागात सुमारे २००० विणकर राहत होते. आता मोजकेच विणकर उरले आहेत. त्यापैकी मो. अश्रफ एक आहेत. त्यांच्या कुटुंबात २०० वर्षांपासून हा व्यवसाय केला जात आहे. त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील आझमगड येथून नागपुरात आले होते. मो. अश्रफ महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली नउवारी साडी तयार करतात. सुरुवातीला विणकाम हा कोष्टी समाजाचा व्यवसाय होता. त्यामुळे मोमीनपुरामध्ये हा समाजही राहतो. विणकर दिगांबर निमजे यांनी हा व्यवसाय डबघाईस आल्यामुळे चिंता व्यक्त केली. त्यांचे कुटुंब १९७० पासून हा व्यवसाय करीत आहे. सरकारची मदत मिळत नसल्यामुळे हा व्यवसाय नष्ट होत आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाचा फटका
आधीच संकटात असलेल्या हातमाग व्यवसायाला कोरोनाचा जोरदार फटका बसला. कोणत्याही सणोत्सवामध्ये उत्पादनाला मागणी नसल्यामुळे कमाई बंद झाली आहे. विणकरांना जीवन जगण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागत आहेत. नवीन पिढीचा या व्यवसायाकडे ओढा नाही. त्यामुळे या व्यवसायाचे भविष्य अनिश्चित आहे.
कामगारांची कमतरता
एका हातमाग केंद्रामध्ये पाचपेक्षा अधिक कामगारांची गरज असते. परंतु, सध्या सर्वत्र कुशल कामगारांची कमतरता आहे, अशी माहिती मो. अश्रफ यांनी दिली.
कला वाचविण्यासाठी ‘ऑरेंज ओडीसी’
आर्किटेक्ट मंदिरा नेवारे व अमोल वंजारी यांनी ही कला वाचविण्यासाठी ‘ऑरेंज ओडीसी’ हा उपक्रम सुरू केला आहे. शहरात अनेक विणकर आहेत. ते जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्याविषयी नागरिकांना माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.