साैदेबाजी करणाऱ्या दलालांची टाेळी हाेती सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:56+5:302021-05-31T04:07:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : येथील आर्चऐंजल हाॅस्पिटलमध्ये सेवारत असलेल्या फैजाम खान वल्द सागीर अहमद खान पठाण (२९) याला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : येथील आर्चऐंजल हाॅस्पिटलमध्ये सेवारत असलेल्या फैजाम खान वल्द सागीर अहमद खान पठाण (२९) याला ‘रेमडेसिविर आणि टॉसिलिझुमॅब’ या इंजेक्शनच्या काळाबाजारप्रकरणी अटक करण्याचे वृत्त झळकताच सर्वत्र एकच खळबळ उडाली.
कोरोनाच्या महामारीत दुसऱ्या लाटेत अनेकांवर जीवघेणे आघात सुरू असताना उमरेड, भिवापूर आणि कुही परिसरात तसेच लगतच्या भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीच्या असंख्य तालुक्यांमध्ये या काळ्या कारभाराची पाळेमुळे पसरली होती. शिवाय, या संपूर्ण परिसरात आकर्षक कमिशनवर इंजेक्शन विक्री करून देणारी एजंटांची टोळीसुद्धा सक्रिय होती, अशाही गंभीर बाबी आता बोलल्या जात आहेत.
ही सौदेबाजी मोबाईलवरूनच विशिष्ट सांकेतिक भाषांचा वापर करीत केली जात होती. यातून लाखो रुपयांची माया गोळा करीत अनेक जण गबर बनले. अनेकांचा जीव टांगणीला असताना मुद्दाम रुग्णांच्या आणि आप्तस्वकीयांच्या मनात धडकी भरवायची, नको त्या भाषेत उद्धटपणाची वागणूक द्यायची, असा संपूर्ण उपक्रम आर्चएंजल हाॅस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये माझ्यासह असंख्य रुग्णांच्या वाट्याला आला असल्याची कैफियत मुन्नादेवी कुशवाह यांनी व्यक्त केली.
सुमारे वर्षभरापासून होमिओपॅथीचा डॉक्टर असलेला आरोपी फैजाम खान हा कोविड सेंटरमधील आयसीयु सांभाळायचा. त्यामुळे प्रत्येक कोरोना रुग्णांशी तो संपर्कात होता. नागपूर जिल्ह्यात केवळ एकमेव खासगी कोविड सेंटर असल्याने याठिकाणी नागपूर जिल्ह्यासह लगतच्या भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया येथील असंख्य रुग्णांनी उपचार घेतला आहे. या रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या माध्यमातूनच ‘रेमडेसिविर आणि टॉसिलिझुमॅब’ इंजेक्शनची हवा पसरविली जात होती, अशीही बाब व्यक्त होत आहे.
हा काळाबाजार केवळ फैजाम खान याचा एकट्याचा नसून यामध्ये हाॅस्पिटलमधूनच अजून कोण-कोण सहभागी होते, हा तपासाचा भाग आहे. यादृष्टीनेही अंबाझरी नागपूर पोलिसांचा चमू कामाला लागला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास या गोरखधंद्यांचा ‘मास्टरमाईंड’सुद्धा गळाला लागू शकतो, असे बोलले जात आहे. याप्रकरणी आर्चएंजलचे सर्वेसर्वा डॉ. जगदिश तलमले यांच्याशी रविवारी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
....
आम्हीसुद्धा चौकशी करू
आर्चएंजल हाॅस्पिटलचा होमिओपॅथी डॉक्टर फैजाम खान याच्या प्रकरणाबाबत तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रमोद कदम यांच्याशी चर्चा केली असता, आम्हीसुद्धा कोविड सेंटरच्या संपूर्ण माहितीची तपासणी करू, असे सांगितले. रुग्णांची संख्या, आलेले ‘रेमडेसिविर-टॉसिलिझुमॅब’ इंजेक्शन्स आणि केलेला वापर आदी इत्यंभूत माहिती तपासणार असल्याचे कदम म्हणाले. कोविड सेंटरवर जिल्हाधिकाऱ्यांचा कंट्रोल असतो. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करू. काही तथ्य आढळून आल्यास नक्कीच कारवाई करणार, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.