तलावांच्या सफाईसाठी सरसावले हात
By admin | Published: September 18, 2016 02:47 AM2016-09-18T02:47:50+5:302016-09-18T02:47:50+5:30
गणेश विसर्जनानंतर सोनेगाव तलाव साफ करण्यासाठी भाजप दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : अनिल सोले, ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचा पुढाकार
नागपूर : गणेश विसर्जनानंतर सोनेगाव तलाव साफ करण्यासाठी भाजप दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने तलाव परिसरातील नागरिकांना स्वच्छता अभियानात सहभागाचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास ७०० नागरिक सरसावले अन् अवघ्या दोन तासात त्यांनी सामूहिक प्रयत्न करून अवघा सोनेगाव तलाव आणि परिसर स्वच्छ केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनानिमित्त सेवा दिवसाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी सोनेगाव तलावाची स्वच्छता करण्यात आली. भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या आवाहनाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजता सोनेगाव तलाव परिसरात शेकडो महिला आणि पुरुष गोळा झाले. प्रत्येकाने आपल्या सोबत मोठमोठे घमेले, फावडे, टोपल्या आणल्या होत्या. तलावाकाठावरील कचरा, प्लास्टिक फावड्याच्या साहाय्याने तर तलावाच्या आतील कचरा बांबूला टोपल्या बांधून तलावाच्या काठावर आणण्यात आला. हा कचरा पोत्यात भरण्यात आला. हे पोते डम्पिंग यार्डमध्ये नेण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत सोनेगाव तलाव परिसर स्वच्छ झाला. तलावाच्या मध्यभागातील कचरा बोटीद्वारे काढण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन या संघटनेचे आमदार प्रा. अनिल सोले, नगरसेवक प्रकाश तोतवानी, गिरीश देशमुख, नगरसेविका पल्लवी शामकुळे, नीलिमा बावणे, उषा निशितकर, भाजप दक्षिण-पश्चिम नागपूरचे अध्यक्ष प्रकाश भोयर, किशोर वानखेडे, श्रीकांत भुरे, विवेक गर्गे, राम मुंजे, दिलीप दिवे, नंदा जिचकार, अनसूया गुप्ता, स्नेहल गोतमारे, आशिष पाठक, छोटू बोरीकर आदी कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे सोनेगाव तलाव स्वच्छ होऊ शकला, त्यामुळे हे जनतेचे यश आहे, असे मत आमदार प्रा. अनिल सोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)
१५ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जन
सोनेगाव परिसरात विसर्जनासाठी कृत्रिम टँक ठेवण्यात आले होते. प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून कृत्रिम टँकमध्ये विसर्जनाचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानुसार परिसरातील १५ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करण्यात आले. शनिवारी राबविण्यात आलेल्या सफाई अभियानातही जवळपास ३ ट्रक कचरा तलावाबाहेर काढण्यात आला. तर २५० टन निर्माल्य खतासाठी अंबाझरी येथे पाठविण्यात आले.