जलपर्णी काढण्यासाठी नागपुरकरांचे सरसावले हात

By सुमेध वाघमार | Published: June 16, 2024 08:14 PM2024-06-16T20:14:15+5:302024-06-16T20:16:27+5:30

-अंबाझरी तलाव स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

hands of the nagpurkar get ready to harvest water leaves | जलपर्णी काढण्यासाठी नागपुरकरांचे सरसावले हात

जलपर्णी काढण्यासाठी नागपुरकरांचे सरसावले हात

सुमेध वाघमारे, नागपूर : अंबाझरी तलावाला जलपर्णीतून मोकळा करण्यासाठी महानगरपालिकेच्या मदतीच्या हाकेला रविवारी नागपुरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. जलपर्णी काढण्यासाठी ५००वर लोकांचे हात सरसावले. ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. लोकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. 

अर्ध्याहून अधिक अंबाझरी तलाव जलपर्णीने व्याप्त आहे. मनपातर्फे वेगवेगळ्या पद्धतीने जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यात लोकांनाही सहभागी करून घेण्यासाठी  मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी तलाव स्वच्छतेसाठी नागरिकांनी स्वयंस्फूतीर्ने पुढे येण्याचे आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी सकाळी नागरिकांनी पुढे येत श्रमदान केले. जलपर्णी ही पाच दिवससात दुप्पट होते त्यामुळे जनसहभागातून जलपर्णी तलावाबाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. याप्रसंगी मनपाचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह मनपाचे अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेत  ग्रीन व्हिजन फाउंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, सायकलपटू डॉ. अमित समर्थ, जलतरणपटू जयंत दुबळे, जयप्रकाश दुबळे, रवी परांजपे यांच्यासह केंद्रीय रिझर्व पोलीस दलाचे जवान, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशामन दलाचे जवान, मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवान, जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन, डॉल्फिन स्पोर्टिंग क्लब, नागपूर डिस्ट्रिक्ट एक्वेटिक असोसिएशनचे जलतरणपटू, विजयिनी ग्रुप, सुभाष मंडळ,  डिगडोह जागृती मंच,विदर्भ सर्प मित्र समिती, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यंच्यासह अंबाझरी तलावात पोहायला येणारे नागरिक यांनी तलावातून जलपर्णी बाहेर काढण्यासाठी हातभार लावला.

मानवी साखळी करून जलपर्णी काढली बाहेर

मानवी साखळी तयार करून एकमेकांच्या हातात हात देत तलावातून जलपर्णी बाहेर काढण्यात आली. जलतरणपटू आणि विविध विभागाच्या जवानांनी पाण्यात पोहत रस्सीच्या सहाय्याने जलपर्णी तलावाच्या काठापर्यंत आणली, तेथून मशीनच्या साह्याने जलपर्णी बाहेर काढण्यात आली. जलपर्णी बाहेर काढण्याच्या कामासाठी मनपाद्वारे १० पोकलेन मशीन, १० जेसीबी मशीन, २० टिप्पर, पाण्यातील बोट, जलदोस्त मशीन आदींचीही मदत घेण्यात आली.

-निरी संस्थेचीही मदत 

मनपा आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, तलावातून  जलपर्णी काढण्याचे काम मनपाद्वारें लवकरच पूर्ण केले जाईल. याकरिता नीरी संस्थेचीदेखील मदत घेण्यात येत आहे. अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याचे काम पुढील काही दिवस सतत सुरू राहणार आहे. 

-चिमुकल्यासह ज्येष्ठांचाही सहभाग

जलपर्णी काढण्यासाठी आठ वर्षाच्या आराध्या शर्मापासून ते ८३वर्षांचे श्रापाद बुरडे यांनीही मदत केली. सामाजिक संघटनेचे कार्यकर्तेही सरसावले होते. तरुण व महिलांची विशेष उपस्थिती होती.

Web Title: hands of the nagpurkar get ready to harvest water leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर