राजच्या मारेकऱ्याला फाशी द्या : संतप्त नागरिकांचा पोलिसांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 08:44 PM2021-06-12T20:44:30+5:302021-06-12T20:45:46+5:30
Raj kidnapping murder case निरपराध राज ऊर्फ मंगलू राजकुमार पांडे या पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद शनिवारी हिंगणा तालुक्यात उमटले. राजच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच फास्ट ट्रॅक न्यायालयात या घटनेचा खटला चालविण्यात यावा, अशी मागणी करीत संतप्त नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना घेराव केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : निरपराध राज ऊर्फ मंगलू राजकुमार पांडे या पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद शनिवारी हिंगणा तालुक्यात उमटले. राजच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच फास्ट ट्रॅक न्यायालयात या घटनेचा खटला चालविण्यात यावा, अशी मागणी करीत संतप्त नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना घेराव केला. एमआयडीसी परिसरात गेल्या काही वर्षांत अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. यातूनच अशात घटनांत वाढ झाल्याचा आरोप नागरिकांनी केला.
गुरुवारी सायंकाळी इंदिरानगरातील राज पांडे या मुलाला शेजारी राहणाऱ्या आरोपी सूरज शाहूने मोटरसायकलवर बसवून हुडकेश्वर भागातील जंगलात नेऊन त्याची हत्या केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. एमआयडीसी परिसरात राजरोसपणे चालणारी अवैध दारू-गांजा विक्री, सट्टापट्टी तातडीने बंद करण्यात यावी. अवैध धंदे चालविणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
पं.स.सदस्य आकाश रंगारी, उपसरपंच कैलास गिरी, सुरेश कालबांडे, ग्रामपंचायत सदस्य विनोद ठाकरे, बंडू भोंडे यांच्या उपस्थितीत मृतक राजचे वडील राजकुमार व आई गीता पांडे यांच्यासह वस्तीतील शंभरहून अधिक महिला व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रकरणाचा तपास योग्य रीतीने व्हावा या मागणीचे निवेदन सहायक पोलीस आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांना याप्रसंगी देण्यात आले. एमआयडीसी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी इंदिरानगरसह इतर भागांत पोलीस पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विनोद ठाकरे यांनी केली.