'आरोपीला फाशी, पत्नीला नोकरी अन् मिलिंदवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 10:34 PM2022-12-15T22:34:40+5:302022-12-15T22:36:33+5:30
Nagpur News महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान मिलिंद खोब्रागडेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावेत, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि मिलिंदची पत्नी ग्रीष्णाला नोकरी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधीक्षक दीपक देवराज यांना करण्यात आली.
नागपूर : वेकोलिच्या इंदर कोळसा खाण क्रमांक ६ च्या चेक पोस्टजवळ रविवारी ११ डिसेंबरला झालेल्या गोळीबारात मृत्यू पावलेला महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान मिलिंद खोब्रागडेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावेत, गोळीबारातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि मिलिंदची पत्नी ग्रीष्णाला नोकरी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधीक्षक दीपक देवराज यांना करण्यात आली.
रविवारी ११ डिसेंबरला आरोपी समीर सदरुल सिद्दीकी (३०, अष्टविनायक कॉलनी, टेकाडी ता. पारशिवनी) आणि राहुल जोसेफ जेकप (२६, कांद्री कन्हान, ता. पारशिवनी) यांनी गोळ्या झाडल्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान मिलिंद खोब्रागडे गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मिलिंदच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयात संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी मिलिंदचा मृतदेह मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. तेथे मिलिंदची पत्नी ग्रीष्माला नोकरी द्यावी, कर्तव्यावर असताना गोळीबारात मृत्यू झाल्यामुळे मिलिंदवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मिलिंदचा भाऊ प्रफुल्ल खोब्रागडे, प्रतिभा खोब्रागडे आणि मिलिंदची पत्नी ग्रीष्माने केली आहे. मृत मिलिंदची पेट्रोलिंगची ड्युटी असताना त्याची चेकपोस्टवर ड्युटी लावण्यात आली. तसेच चेकपोस्टवर चौघांची ड्युटी लावणे गरजेचे असताना एकाचीच ड्युटी का लावली ? याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली. शवविच्छेदनानंतर कुटुंबीय मिलिंदचा मृतदेह घेऊन अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील रंभापूर या गावाकडे रवाना झाले.
निवेदनावर योग्य ती कारवाई करू
‘मृत जवान मिलिंद खोब्रागडेची पत्नी ग्रीष्माचे लेखी निवेदन आम्ही घेतले आहे. तिला नोकरीत सामावून घेण्याबाबत मुंबई मुख्यालयाच्या वतीने निर्णय घेण्यात येईल. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे ही राज्य शासनाच्या अखत्यारीतील बाब आहे. ’
-दीपक देवराज, अधीक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल
..........