नागपूरच्या होटल ‘ली मेरेडियन’मध्ये ‘हंगामा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:43 AM2018-01-02T00:43:39+5:302018-01-02T00:45:35+5:30

'Hangama' in 'Le Meridien' in Nagpur hotel | नागपूरच्या होटल ‘ली मेरेडियन’मध्ये ‘हंगामा’

नागपूरच्या होटल ‘ली मेरेडियन’मध्ये ‘हंगामा’

googlenewsNext
ठळक मुद्देन्यू इयर सेलिब्रेशन : पैसे घेतले, व्यवस्थाच केली नाही : संतप्त ग्राहकांची फेकाफेक

आॅनलाईन लोकमत
नागपूर : न्यू इयर सेलिब्रेशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ग्राहकांना तिकीट विकून त्यांची योग्य व्यवस्था न केल्यामुळे पैसे मोजणाऱ्या ग्राहकांनी होटल ‘ली मेरेडियन’मध्ये रविवारी मध्यरात्री जोरदार ‘हंगामा’ केला. संतप्त तरुण-तरुणींनी हॉटेलमधील प्लेटा, खुर्च्यांची फेकाफेक करीत आपला रोष व्यक्त केला. वेळीच पोलीस पोहोचल्याने संभाव्य अनर्थ टळला.
न्यू इयर सेलिब्रेशनच्या नावाखाली खानपानासोबत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वर्धा मार्गावरील हॉटेल ली मेरेडियनने जोरदार जाहिरातबाजी केली होती. हॉटेल व्यवस्थापनाने सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी विशिष्ट प्रवेश शुल्क (तिकीट) ठेवले होते. नववर्षांचे स्वागत आणि खानपान, नाचगाणे करण्यासाठी तरुणाईने मोठी रक्कम देऊन तिकीट विकत घेतले. या पार्श्वभूमीवर मर्यादेपेक्षा जास्त लोकांनी रविवारी रात्री तिकीटच्या आधारे हॉटेल परिसरात प्रवेश केला. त्यांच्या मते, हॉटेल प्रशासनाने खानपानाची पुरेशी व्यवस्था केली नाही. रात्री ११ नंतर जेवणाची प्लेट घ्यायला गेलेल्यांना जेवण मिळाले नाही. बराच वेळ प्रतीक्षा करूनही जेवण न मिळाल्याने संतप्त तरुणांनी हॉटेल प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, तेथे केवळ वेटर होते. तरुणांनी आरडाओरड सुरू केली. खानपानाची व्यवस्था कधी होणार, असा प्रश्न केला. त्यांचे समाधान करण्यासाठी हॉटेलचे अधिकारी किंवा व्यवस्थापक आले नाहीत. त्यामुळे तरुण जास्तच संतप्त झाले. त्यांनी आरडाओरड करतानाच खुर्च्या, प्लेटांची फेकाफेक सुरू केली. त्यामुळे वातावरण रोषपूर्ण झाले. संतप्त ग्राहक आपल्या तिकीटचे पैसे परत मागू लागले. वातावरण गरम झाल्याची माहिती कळाल्याने सोनेगावचा पोलीस ताफा हॉटेलमध्ये पोहोचला. ग्राहकांची नाराजी योग्य असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी हॉटेलच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांच्याकडून पैसे घेतले तर त्यांची व्यवस्था व्हायलाच पाहिजे असे सांगून हॉटेल प्रशासनाला समज दिली तर संतप्त ग्राहकांनाही शांत केले.
तक्रार किंवा गुन्हा नाही
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची चर्चा होती. त्या अनुषंगाने सोनेगावचे ठाणेदार संजय पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ झाल्याची सूचना मिळाली होती. त्यामुळे पोलीस तेथे गेले होते. संतप्त ग्राहकांना आम्ही शांत केले. परंतु कुणी तक्रार केली नाही, त्यामुळे असा काही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पांडे म्हणाले.

Web Title: 'Hangama' in 'Le Meridien' in Nagpur hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.