‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान’ने दुमदुमली उपराजधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 09:07 PM2023-04-06T21:07:46+5:302023-04-06T21:08:48+5:30
Nagpur News पवनपुत्र हनुमानाचे गुनगाण करणाऱ्या भजनांच्या गजरात शहरातील राजाबाक्षा हनुमान मंदिरातून हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
नागपूर : ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान’, ‘राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की’ असे पवनपुत्र हनुमानाचे गुनगाण करणाऱ्या भजनांच्या गजरात शहरातील राजाबाक्षा हनुमान मंदिरातून हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सहभागी झालेल्या ६० आकर्षक चित्ररथांनी नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. तर शोभायात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी एकच गर्दी केली होती. याशिवाय गिट्टीखदानसह शहरातील विविध भागांत हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राजाबाक्षा हनुमान मंदिरात महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन, भाजपा नेता दयाशंकर तिवारी, माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते आरती केल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रा राजाबाक्षा हनुमान मंदिर मैदानातून रामबाग, अजंता चौक, उंटखाना हनुमान मंदिर चौक, चंदननगर, मेडिकल चौक, हनुमाननगर, क्रीडा चौक, स्मृती मंदिर रेशीमबाग, तिरंगा चौक, मयूर मंगल कार्यालय, गणेशनगर, नंदनवन बसस्टॉप, श्री गुरुदेवनगर, मंगलमूर्ती लॉन, सक्करदरा चौक, रघुजीनगर, छोटा ताजबाग, महाकाळकर भवन, अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, शारदा चौक, सिद्धेश्वर सभागृह, जवाहरनगर, ताजनगर, मानेवाडा रोड, तुकडोजी चौक, चंद्रमणीनगर, हनुमान मंदिर चौक, वंजारीनगर पाण्याची टाकी, अजनी रेल्वे कॉलनी, टीबी वॉर्ड या मार्गाने राजाबाक्षा हनुमान मंदिरात पोहोचली. शोभायात्रेचे भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. शोभायात्रेच्या मार्गावर विविध संघटनांनी महाप्रसादाचे वितरण केले. यावेळी शोभायात्रा समितीचे विवेक तिवारी, अभिषेक तिवारी, डॉ. गोपीनाथ तिवारी, नितीन गुजर, विक्रम गुजर, रवींद्र अवस्थी, सुभाष शर्मा, विजय पुरोहित, संदीप अग्रवाल आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आकर्षक चित्ररथांनी वेधले लक्ष
शोभायात्रेत आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. यात गरुड रथावर हनुमानाची प्रतिमा ठेवलेल्या रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वारकरी पालखीचा चित्ररथ, बेलबंडीवर श्री गणेशाची मूर्ती, भगवान शंकराचा रथ, श्रीकृष्ण लीला चित्ररथ, श्रीराम-जानकी यांचा चित्ररथ आदी चित्ररथांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
ओसंडून वाहिला बालगोपालांचा उत्साह
राजाबाक्षा हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त नागरिक आपल्या बालगोपालांना घेऊन आले होते. यातील अनेक बालकांनी मंदिर परिसरात असलेल्या दुकानांमधून हनुमानाची गदा, धनुष्यबाण विकत घेतले होते. हनुमानाची आणि श्रीरामाची वेशभूषा केलेले काही बालकही राजाबाक्षा मंदिर परिसरात पहावयास मिळाले. हनुमान जन्मोत्सवात बालगोपाल उत्साहाने सहभागी झाले होते.
सेल्फी वुईथ हनुमान
राजाबाक्षा मंदिर परिसरात सोनवाने नावाच्या युवकाने हनुमानाची वेशभूषा केली होती. हातात गदा घेतलेला हा युवक हुबेहूब हनुमानासारखा दिसत होता. हनुमान जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी आलेली लहान मुले, नागरिक आणि महिलांनी हनुमानासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. तर अनेकांनी आपल्या कुटुंबीयांसोबत हनुमानाच्या वेशभूषेतील युवकासोबत फोटो घेतले.
शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
राजाबाक्षा हनुमान मंदिरातून निघालेल्या शोभायात्रेचे भाविकांनी मार्गात ठिकठिकाणी स्वागत केले. तर अनेकांनी चित्ररथांवर पुष्पवृष्टी केली. शोभायात्रेच्या मार्गात विविध संघटनांनी आलुभात, सरबत, बुंदी, पिण्याच्या पाण्याचे वितरण केले.
..........