असे घडले, वाडीतील वृद्ध दाम्पत्याचे थरारक हत्याकांड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:53 PM2019-04-16T22:53:29+5:302019-04-16T23:06:53+5:30
उपराजधानीत खळबळ उडवून देणा-या वाडीतील शंकर अतुलचंद्र चंपाती (वय ७२) आणि त्यांची पत्नी सीमा (वय ६४) या वृद्ध दाम्पत्याच्या हत्याकांडातील आरोपी प्रियंका ऊर्फ ऐश्वर्या शंकर चंपाती आणि मोहम्मद इकलाक मुस्ताक अहमद (वय २३) या दोघांनी हत्याकांडानंतर लंपास केलेले एक लाख तीन हजारांचे दागिने, हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले. चंपाती दाम्पत्याची कोट्यवधींची मालमत्ता हडपण्याच्या हेतूने मृत दाम्पत्याची दत्तक मुलगी प्रियंका हिने तिचा प्रियकर इकलाकच्या मदतीने थंड डोक्याने कट रचून हे निर्घृण हत्याकांड घडवून आणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाडीतील शंकर अतुलचंद्र चंपाती (वय ७२) आणि त्यांची पत्नी सीमा (वय ६४) या वृद्ध दाम्पत्याच्या हत्याकांडातील आरोपी प्रियंका ऊर्फ ऐश्वर्या शंकर चंपाती आणि मोहम्मद इकलाक मुस्ताक अहमद (वय २३) या दोघांनी हत्याकांडानंतर लंपास केलेले एक लाख तीन हजारांचे दागिने, हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले. कट रचताना आपण आरोपी आहोत, याबाबत कुणालाही शंका येणार नाही, याची आरोपींनी पुरेपूर काळजी घेतली होती. मात्र, या हत्याकांडासाठी त्यांनी केलेला तंत्रज्ञानाचा वापर आणि गैरवापरच त्यांना पोलीस कोठडीत पोहोचविण्यास कारणीभूत ठरला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक मासाळ यांनीही हत्याकांडाच्या संबंधाने माहिती दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि संतोष खांडेकर उपस्थित होते. दरम्यान, आरोपी प्रियंका आणि इकलाक या दोघांना न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे.
यासंबंधाने पत्रकारांना माहिती देताना उपायुक्त भरणे म्हणाले, चंपाती दाम्पत्याची कोट्यवधींची मालमत्ता हडपण्याच्या हेतूने मृत दाम्पत्याची दत्तक मुलगी प्रियंका हिने तिचा प्रियकर इकलाकच्या मदतीने थंड डोक्याने कट रचून हे निर्घृण हत्याकांड घडवून आणले. तिचे इकलाकसोबत आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्न करण्यासाठी तिने धर्मांतर करण्याचीही तयारी केली होती. हे शंकर चंपाती यांना कळताच त्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले होते. तिला संपत्तीपासून बेदखल करण्याचाही इशारा त्यांनी दिला होता. तिला चंपाती दाम्पत्याने आठ महिन्याची असताना मातृसेवा संघातून दत्तक घेतले होते. तिचे वागणे-बोलणे खटकत असल्याने शंकर चंपाती तिला रोज रोज टोचून बोलत होते. त्यामुळे प्रियंका कमालीची अस्वस्थ होती. त्याचमुळे तिने इकलाकच्या मदतीने मातापित्याचा काटा काढण्याचा कट रचला होता. आधीच ठरविल्याप्रमाणे इकलाकने वाडीतील एका डॉक्टरकडून झोपेच्या गोळया मागितल्या. तीव्र क्षमतेच्या या गोळ्या त्याने प्रियंकाला दिल्या. तिने त्याची पावडर बनविली. १४ एप्रिलच्या सकाळी आईवडिलांना टरबूजमधून या झोपेच्या गोळ्यांची पावडर खाऊ घातली.
त्यामुळे काही वेळेतच शंकर आणि सीमा चंपाती गाढ झोपले. तिने लगेच इकलाकला बोलवून घेतले. तो घरी पोहचल्यानंतर त्याला घरातील हातोडी आणि सत्तूर काढून दिला. इकलाकने चंपाती दाम्पत्याच्या डोक्यावर आधी हातोडीने वार केले. नंतर सत्तूरने त्यांचा गळा कापला. त्यानंतर घरातील सोन्याचे नेकलेस, कंगन, मंगळसूत्र, चांदीची पायल आणि मोबाईल लंपास केला. इकलाकपूर्वीच प्रियंका घरून ब्युटी पार्लरमध्ये निघून गेली. तिच्या मागोमाग आरोपी इकलाक पळून गेला. दुपारी १२.३० ते १.३० च्या दरम्यान हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपी प्रियंका दिवसभर नागपुरात शॉपिंग आणि एन्जॉय करीत फिरली. कटाचाच एक भाग म्हणून ती रात्री ८ वाजता घरी पोहचली आणि आईवडिलांची हत्या झाल्याचे तिने पोलीस नियंत्रण कक्षात १०० नंबरवर फोन करून कळविले.
आठवड्यापूर्वी फसला डाव
या दुहेरी हत्याकांडाचा कट रचण्याची कल्पना प्रियंका आणि इकलाकने टीव्ही मालिका, सिनेमा तसेच सोशल मीडियांवरील काही व्हिडीओ बघून घेतली होती. त्यामुळे चार महिन्यात त्यांनी चार वेळा वेगवेगळ्या पद्धतीने हत्या करण्याचे प्रयत्न केले. पहिल्यांदा आरोपी इकलाकने शंकर चंपाती यांना प्रियंकाला त्रास न देण्याचा आणि तिच्या वाट्याची संपत्ती तिला देऊन मोकळे करण्यासाठी धाक दाखवला होता. त्याला ते जुमानत नसल्याने आरोपीने एकदा त्यांना भररस्त्यावर मारहाण करून धावत्या वाहनांसमोर ढकलले होते. त्यावेळी ते बचावले. त्यानंतर प्रियंका आणि इकलाकने एका आठवड्यापूर्वी अशाच प्रकारे त्यांना झोपेच्या गोळ्यांची पावडर खाऊ घातली. मात्र, या गोळ्यांचा परिणाम झाला नाही. त्यामुळे ते बचावले. त्यानंतर ११ एप्रिलला इकलाकने घरात शिरून शंकर चंपाती यांना बेदम मारहाण केली. शेजाऱ्याने रोखण्याच्या प्रयत्न केला असता त्यालाही आरोपीने मारले होते. हे सर्व केल्यानंतर अखेर आरोपींनी १४ एप्रिलला डाव साधला.
हत्याकांडातील आरोपींचा तपास करताना आम्ही प्रारंभी भाडेकरूवर संशय घेतला होता. त्यानंतर शंकर चंपाती यांचे कुणाशी वैर आहे का, त्यांच्या नातेवाईकांचे त्यांच्यासोबत कसे संबंध आहेत, मालमत्तेचा कुणासोबत वाद आहे का, हे तपासले. त्यावेळी प्रियंका आरोपी असू शकते, याची पोलिसांनीही कल्पना केली नव्हती. तिच्याशी बोलताना आत्मविश्वासाने ती बोलत होती. त्यामुळे ती गुन्हा करू शकते, असे वाटत नव्हते.
पहाटे २.३० वाजता पोलीस सायबर शाखेत चौकशी करीत असताना तिचा फेसबुक अकाऊंटचा डाटा, मेल, व्हॉटस्अॅप आणि सर्व मेसेंजरमधून विशिष्ट चॅट डिलीट केली जात असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला अन् या हत्याकांडाचा उलगडा झाल्याचे उपायुक्त भरणे यांनी सांगितले. आरोपींकडून गुन्ह्याच्या वेळी चोरलेले दागिने, मोबाईल जप्त करण्यात आला. गुन्हा करण्यासाठी वापरलेले शस्त्र आणि आरोपीची मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. चंपाती यांना डायरी मेन्टेन करायची सवय होती. ती डायरी गायब असून, आम्ही त्या डायरीचा शोध घेत आहोत. त्यातून आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता असल्याचे उपायुक्त भरणे यांनी सांगितले. वाडी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे हत्याकांड घडल्याची बाब उपस्थित झाली असता, आम्ही त्याची चौकशी करू, असे उपायुक्त मासाळ म्हणाले.
२४ तासात १५० कॉल्स, मेसेज!
हत्याकांडाचा तपास करताना पोलिसांनी प्रियंका आणि इकलाकचा सीडीआर काढला तेव्हा त्यांना प्रियंकाने तिच्या मावस बहिणीला घटनेच्या दिवशी फक्त एक कॉल केल्याचे पुढे आले. त्यानंतर तिचा हिडन डाटा तपासण्यात आला अन् पोलीस चक्रावले. १३ ते १४ एप्रिलपर्यंत प्रियंकाने इकलाकला ६० कॉल्स आणि मेसेज तर त्याने तिला ९० कॉल आणि मेसेज केल्याचे लक्षात आले. हे सर्वच्यासर्व कॉल, मेसेज डिलीट करण्यात आले होते, त्याचमुळे आम्हाला शंका आली आणि आम्ही प्रियंका तसेच इकलाकवर नजर केंद्रित करून या हत्याकांडाचा उलगडा केल्याचे उपायुक्त भरणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
नको करायला पाहिजे होते ...!
पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी प्रियंका तसेच इकलाकला उपरती झाली आहे. सर्व सोयीसुविधायुक्त जीवन, चांगल्या पगाराची नोकरी होती. तो चांगला क्रिकेट खेळाडू आहे. झिम्बाब्वेसह देश-विदेशात अनेक ठिकाणी तो खेळून आला. आता तो इंग्लंडला जाणार होता. त्याचे वडील ट्रान्सपोर्टर आहेत. पैशाची कमी नव्हतीच दोघांना, तरीदेखील आरोपींनी हे थरारक हत्याकांड घडवून आणले. चौकशीदरम्यान या मुद्यांकडे पोलिसांनी आरोपीचे लक्ष वेधल्यावर प्रियंका आणि इकलाक आता पश्चाताप होत असल्याचे पोलिसांना सांगत आहेत. आपण केलेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य आणि भीषणता आता कळली. आम्ही हे नको करायला पाहिजे होते, असे ते पोलिसांसमोर कबूल करीत आहेत.
उपराजधानीत खळबळ उडवून देणा-या या दुहेरी हत्याकांडाचा तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या १२ तासात पोलिसांनी छडा लावला आणि दोन्ही आरोपींना अटक केली. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, उपायुक्त नीलेश भरणे, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, सहायक निरीक्षक प्रशांत चौगुले, गोरख कुंभार, फौजदार वसंता चौरे, राजकुमार देशमुख, श्रीनिवास मिश्रा, हवालदार सुनील चौधरी, नरेश रेवतकर, नरेश सहारे, सुरेश ठाकुर, नायक राजेश टेंगुरिया, आशीष ठाकरे, अमित पात्रे, रवींद्र बारई, शिपायी मंगेश मड़ावी, सुनील श्रीवास, बबली इंगोले, आशीष देवरे, देवीप्रसाद दुबे, राजेश सेंगर, बबलू मायकल, नीलेश वाड़ेकर, सूरज भोंगाडे आणि आशीष पाटिल यांनी बजावली.