तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्व काही सांगत होता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 08:29 PM2020-05-19T20:29:20+5:302020-05-19T20:54:52+5:30
तिला उचलून खुर्चीवर बसवलं आणि घराबाहेर आणलं तेव्हा तिने आनंदाने काढलेला आवाज आणि आईकडे पाहून जेवढा शक्य असेल तेवढा उंचावलेला हात हा तिच्या आनंदाला पारावर उरला नसल्याचे सांगत होता.. तिच्या चेहऱ्यावरची निर्मळता आणि हास्यामधली निखळता सोडून बाकी काहीच महत्त्वाचं नव्हतं.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: तिला उचलून खुर्चीवर बसवलं आणि घराबाहेर आणलं तेव्हा तिने आनंदाने काढलेला आवाज आणि आईकडे पाहून जेवढा शक्य असेल तेवढा उंचावलेला हात हा तिच्या आनंदाला पारावर उरला नसल्याचे सांगत होता.. तिच्या चेहऱ्यावरची निर्मळता आणि हास्यामधली निखळता सोडून बाकी काहीच महत्त्वाचं नव्हतं.
नेहा आझाद सिंग. वय वर्षे १८. राहणार मिहानमधील एका पुलाखालच्या पत्र्याच्या खोपट्यात. आईवडील मजूर.
गेली १८ वर्षे अंथरुणावरच असलेली ही मुलगी आज एका व्हील चेअरवर बसून घराबाहेरचे जग पाहत होती. ती आज एका अर्थाने स्वतंत्ररित्या उभी होती..
नेहा जन्मत:च विशेष अपत्य होती. तिची जुळी बहीण ही सामान्य अपत्य आहे. त्यांचे आईवडील असलेले आझाद सिंग व पूनम सिंग हे दोघेही उत्तरप्रदेशातून १५-२० वर्षांपूर्वी नागपुरात येऊन स्थायिक झाले. मिहान परिसरात मोलमजुरी करून पोट भरणारे हे कुटुंब. त्यांना या दोन जुळ््या मुली झाल्या तेव्हा नेहा विशेष अपत्य असल्याचे लक्षात आले. तिचे संगोपन त्यांनी फार कष्टाने व जबाबदारी आतापर्यंत केले आहे. नेहाची बहीण आकांक्षा ही दहावीत आहे.
नेहाला उभं राहणे किंवा स्वतंत्र रित्या बसता येणे शक्य होत नाही. त्यामुळे ती कायमच अंथरुणावर असते. त्यातून तिला काही आजारही होत राहतात. सुषमा कांबळे मिहान परिसरात धान्याचे कीट वाटप करण्यासाठी फिरत असताना त्यांचा नेहाच्या कुटुंबासोबत परिचय झाला. नेहाची गरज लक्षात आल्यावर त्यांनी टुगेदर वुई कॅनचे शोएब मेमन यांच्याशी संपर्क साधला. शोएब यांनी पुढाकार घेत नेहाला व्हील चेअर मिळवून देण्याचे ठरवले. नागपुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा शशांक मनोहर यांच्या आर्थिक सहकार्याने त्यांनी नेहाला व्हीलचेअर मिळवून दिली. वर्षा मनोहर या नागपुरातील ज्येष्ठ नागरिकांकरिता तसेच मेडिकलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. शोएब मेमन यांचा टुगेदर वुई कॅन हा ग्रूप लॉकडाऊन काळात श्रमिकांकरिता व मजूर वर्गाकरिता धान्यवाटपासह मदतीची बरीच कामे करत आहे.