अक्षय पात्र देणार विद्यार्थ्यांना ‘हॅपीनेस किट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:12 AM2021-08-12T04:12:31+5:302021-08-12T04:12:31+5:30
कोराडी : शालेय पोषण आहार अंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना खिचडीचा पुरवठा करणारी सामाजिक संस्था ‘अक्षय पात्र’ ...
कोराडी : शालेय पोषण आहार अंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना खिचडीचा पुरवठा करणारी सामाजिक संस्था ‘अक्षय पात्र’ आता विद्यार्थ्यांना ‘हॅपीनेस किट’ देणार आहे. या किटमध्ये मुलांसाठी कोरडे शिधाधान्य, शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी व स्वच्छता उत्पादनाचा समावेश आहे. शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराव्यतिरिक्त ही किट मुलांना देण्यात येत आहे. ‘अक्षय पात्र’ या सामाजिक संस्थेला ही किट ‘इडलगीव’ या संस्थेकडून दान स्वरूपात मिळालेली आहे. या किटमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक सराव पुस्तिका, एक नोटबुक, टुथपेस्ट, ब्रश, हळद पावडर, मीठ, शेंगदाणे अर्धा किलो, गूळ एक किलो, भाजी मसाला, कलमी, तुरीची डाळ एक किलो, हरभरा अर्धा किलो, अंघोळीची साबण, आटा दोन किलो, पेन व पेन्सिल आदी साहित्याचा यात समावेश आहे. काही शाळांपर्यंत या किट पोहोचल्या असून वाटपालाही सुरुवात झालेली आहे. या संस्थेला मिळालेल्या दानातून या किट तयार करण्यात आल्या असून, प्राप्त माहितीनुसार एका किटवर सर्व सेवा व साहित्याचा खर्च मिळून ७०० रुपयापर्यंत खर्च आला आहे. असे असले तरी शाळाशाळांमध्ये यामुळे भेदभाव दिसणार आहे. कारण शासनाच्या वतीने पोषण आहार शिजवून देण्यासाठी अक्षय पात्र व अन्नपूर्णा या दोन संस्थेची निवड करण्यात आली आहे. काही शाळांमध्ये अन्नपूर्णा या संस्थेमार्फत पोषण आहार शिजवून दिला जातो तर, काही ठिकाणी अक्षय पात्र या संस्थेकडून पोषण आहार शिजवून दिला जातो. विशेष म्हणजे, एका संस्थेच्या ज्या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक विभाग वेगवेगळे आहेत अशा बहुतेक ठिकाणी प्राथमिक विभागाला वेगळी संस्था तर, माध्यमिक विभागाला वेगळ्या संस्थेद्वारे पोषण आहार पुरविला जातो. अक्षय पात्रकडून ही फिटनेस किट मिळत आहे. कोराडी येथे पाच शाळांमध्ये अक्षय पात्राद्वारे पोषण आहार मिळतो तर, उर्वरित सर्व शाळांमध्ये अन्नपूर्णा संस्थेकडून आहार दिला जातो. अक्षय पात्रकडून आहार दिल्या जाणाऱ्या पाच शाळांपैकी काही शाळांमध्ये या किट पोहोचल्या आहेत.