हापूसची तहान बैंगनफल्लीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:37 AM2019-05-20T11:37:42+5:302019-05-20T11:39:36+5:30
अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या विक्रीत वाढ होते. सध्या कळमना फळे बाजारात सर्व प्रकारच्या आंब्यांची आवक वाढली असून दर सर्वसामान्यांच्या आटोक्यात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या विक्रीत वाढ होते. सध्या कळमना फळे बाजारात सर्व प्रकारच्या आंब्यांची आवक वाढली असून दर सर्वसामान्यांच्या आटोक्यात आहेत. त्यातच आंध्र प्रदेशातील बैगनफल्ली आंब्याला सर्वाधिक मागणी आणि पसंती आहे. पूर्वीच्या तुलनेत किरकोळमध्ये प्रति किलो भाव ५० ते ६० रुपयांवर आहेत. भाव कमी असल्यामुळे नागपूरकर आंब्याचा गोडवा चाखत आहेत. आता ऊन चांगले तापू लागल्याने भाव कमी होण्याची शक्यता आहे. सध्या घरोघरी आमरसाचा पाहुणचार सुरू आहे.
भाव आणखी कमी होणार
रसाचा आंबा म्हणून बैगनफल्लीचा नागपुरात सर्वाधिक खप आहे. किरकोळ बाजारात बहुतांश हातगाड्यांवर विक्री सुरू आहे. अवकाळी पाऊस न आल्यास पुढे आवक वाढून दर आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. २० दिवसांपूर्वी घाऊक बाजारात ६० ते ८० आणि किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलो असलेला बैगनपल्ली आंबा आता घाऊक बाजारात ४० च्या खाली गेला आहे. पुढील काही दिवसांत किरकोळमध्ये ५० च्या आत विक्री होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
दशहरी व लंगडा आंब्याला मागणी
कळमन्यात आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि दिल्ली येथून दररोज १५० ते २०० ट्रक आंब्याची आवक होत आहे. यामध्ये बैगनफल्ली, तोतापुरी, दशहरी, लंगडा, केसर, हापूस आंब्यांचा समावेश आहे. याशिवाय नागपूरलगत भिवापूर, मांढळ, गोंदिया, वरुड येथून गावराणी आंब्यामध्ये मुख्यत्वे लंगडा, दशहरी, चौसा मोठ्या प्रमाणात येत आहे. कळमन्यात हापूस ४०० ते ६०० रुपये किलो, दशहरी ४० ते ५०, लंगडा ३० ते ४०, केसर १०० ते १५०, तोतापुरी ३५ ते ७०, बैगनफल्ली ३० ते ४० आणि गावराण २० ते ४० रुपये भाव आहेत. पण किरकोळमध्ये भाव कळमन्याच्या तुलनेत दीडपट आणि दुप्पट आहेत. रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे भाव जास्त असून मागणी कमी आहे. त्यामुळे आडतिये विक्रीसाठी फार कमी प्रमाणात बोलवीत आहेत. डझन पेट्यांमध्ये आवक सुरू आहे.
आवक वाढली, दर कमी
यावर्षी सर्व प्रकारच्या आंब्याची आवक वाढली असून नागपुरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या बैगनफल्लीची आवक आंध्र प्रदेशातून होत आहे. कळमन्यात भाव कमी असले तरीही किरकोळमध्ये भाव जास्त आहेत. पुढे भाव कमी होण्याची शक्यता आहे.
-आनंद डोंगरे, माजी अध्यक्ष,
कळमना फळ बाजार असोसिएशन