गडकरींना वाढदिवसाच्या ‘हाऊसफुल्ल’ शुभेच्छा
By admin | Published: May 28, 2016 03:01 AM2016-05-28T03:01:56+5:302016-05-28T03:01:56+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या ५९ व्या वाढदिवशी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दिवसभर नेते, कार्यकर्त्यांची वाड्यावर रीघ : मुख्यमंत्र्यांनीदेखील घेतली भेट
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या ५९ व्या वाढदिवशी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. महाल येथील गडकरी वाड्यावर दिवसभर नेते व कार्यकर्त्यांची रीघ लागली होती व वाडा अक्षरश: ‘हाऊसफुल्ल’ झाला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दुपारच्या सुमारास गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे काम करण्याची आणखी स्फूर्ती मिळते, अशा भावना गडकरी यांनी यावेळी व्यक्त केल्या.
शुक्रवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडकरींना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. याशिवाय श्री श्री रविशंकर, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे इत्यादी नेत्यांसह देशातील केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, राज्यातील आमदार, बॉलिवूडमधील नामवंतांनी गडकरी यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: येऊन गडकरींना शुभेच्छा दिल्या. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. याशिवाय केंद्रीय विधी व न्यायमंत्री डी.व्ही.सदानंद गौडा, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री निहालचंद मेघवाल, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातील खासदार, आमदारांनी गडकरी यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.(प्रतिनिधी)
सामान्य, आबालवृद्धांचीदेखील उपस्थिती
एकीकडे ‘व्हीव्हीआयपी’, ‘व्हीआयपी’ नेत्यांची भेट घेत असताना गडकरी वाड्याचे दरवाजे सामान्य नागरिक, कार्यकर्त्यांसाठीदेखील खुले होते. अगदी झोपडपट्टीत राहणाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वच स्तरांतील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांचादेखील समावेश होता.
गोरगरिबांच्या सेवेतच खरे समाधान : गडकरी
नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत गडकरी यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी आरोग्य तपासणी शिबिरांसारख्या विधायक उपक्रमाचे आयोजन केले हे कौतुकास्पद आहे. गरिबांची सेवा करण्यात मला खरे समाधान मिळते व तेच माझ्यासाठी खरे राजकारण आहे. यापुढेदेखील गोरगरीब व वंचितांसाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न असेल. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या शुभेच्छांतून यासाठी मला शक्ती मिळते, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.