शुभ पावलांनी आली दिवाळी, स्वरसंगतीने उजळली पहाट ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:35 AM2019-10-27T00:35:17+5:302019-10-27T00:39:08+5:30

दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह अन् जल्लोष. सर्वत्र नाविन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई. संपन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमनही स्वरसुरांनी झाले तर बातच न्यारी.

Happy Diwali, Diwali with a harmonious dawn ... | शुभ पावलांनी आली दिवाळी, स्वरसंगतीने उजळली पहाट ....

शुभ पावलांनी आली दिवाळी, स्वरसंगतीने उजळली पहाट ....

Next
ठळक मुद्देदिवाळी पहाट अन् संध्येने शहरात सुगम संगीताने वातावरण केले प्रफुल्लित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह अन् जल्लोष. सर्वत्र नाविन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई. संपन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमनही स्वरसुरांनी झाले तर बातच न्यारी. बसुबारस, धनत्रयोदशीपासून दीपोत्सवास सुरुवात झाली आणि ठिकठिकाणी संगीताच्या मैफिलिंनी संपूर्ण शहरातील सांगितिक बैठकीचे अधिष्ठान प्रदान केले. वस्त्यावस्त्यांमध्ये दिवाळी पहाट अन् संध्येचे कार्यक्रम उत्साहात पार पडले.
आलाप संगीत विद्यालयातर्फे ‘रंग दीपावलीचे, सूर आनंदाचे’
नवीन सुभेदार ले-आऊट येथील आलाप संगीत विद्यालयातर्फे दत्तात्रयनगर येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात ‘रंग दीपावलीचे, सूर आनंदाचे’ हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम आनंदात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत चौधरी व आरती प्रकाश आमटे नानकर उपस्थित होते. सूर्यश्लोकाने कार्यक्रमास सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्याम निसळ व संचालिका अंजली निसळ यांनी केले. यावेळी आलाप तर्फे सूर्यनारायण रुग्ण साहित्य सेवा केंद्राला दिवाळी भेट अर्पण करण्यात आली. यावेळी १५० हून अधिक कलावंतांचा दिवाळी पहाटचा हा कार्यक्रम २००० हून अधिक नागरिकांनी अनुभवला. विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्याद्वारे रसिकांचा भारतीय संस्कृतीचे अनुपम दर्शन घडविले. जय जय सुरवर, गजानना, उठी उठी गोपाळा, अरे कृष्णा अरे कान्हा, दिवाळी येणार अशा विविध गीतांचे सुरेल सादरीकरण यावेळी झाले. राम भाकरे व अंजली निसळ यांनी सादर केलेल्या नाट्यगीत व भक्तिगीतांना श्रोत्यांची वाहवा मिळाली. निवेदनाची बाजू संगीता तांबोळी यांनी सांभाळली. विविध रागांवर गाणी सादर झाली. तबला, सतार, व्हायोलिनच्या जुगलबंदीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाद्यांवर विशाल दहासहस्र, निशिकांत देशमुख, सौरभ किल्लेदार, अनिकेत दहेकर, मनोज धुरी, प्रसन्न निळोपंत, आनंद यांनी साथसंगत केली. यावेळी आ. मोहन मते, देवेन दस्तुरे, माणिक पौनीकर, श्रीकांत गडकरी, डॉ. ज्ञानेश्वर ढाकुलकर, देशकर, अग्निहोत्री उपस्थित होते.
रजनीगंधाची कारागृहात रंगली दिवाळी पहाट 


रजनीगंधाच्यावतीने मध्यवर्ती कारागृहात दिवाळी पहाटचे आयोजन उत्साहात पार पडले. संकल्पना परिणिता मातूरकर यांची होती. परिणिता मातूरकर, सिमरन नायडू, तुषार विघ्ने, दीपक तांबेकर, रवींद्र परांजपे, प्रिया गुप्ता, स्वप्निल घाटे, प्रमोद अंधारे, प्रशांत मानकर, विनोद मानकर, गीता खेडकर, अंजली बांगडे, प्रकाश देशपांडे, मुकेश श्रीवास्तव, अजय देशपांडे, माधव पटले. सुनील दहीकर व कामिनी बनसोड या गायक कलाकारांनी विविध गीते सादर केली. ‘तुम्ही हो माता’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अश्विनी तू ये ना, ये दिल, यम्मा यम्मा, चांदणे शिंपीत जाशी, शुक्रतारा मंद वारा, दिल क्या करे अशी विविध सुमधूर हिंदी व मराठी गीते गायकांनी यावेळी सादर केली. ‘मेरे महबूब कयामत होगी’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. कारागृहातील बंदिवानांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
स्वरवेधतर्फे ज्येष्ठ गायिकांनी दिली दिवाळी भेट 

रसिकांच्या मनाच्या सांदिकोपऱ्यात कायमस्वरूपी निनादत असलेल्या जुन्या सुवर्णस्पर्शी गीतांचा मधुर स्वरानंदाचा नजराणा स्वरवेधतर्फे सादर झाला. सीताबर्डी येथील ‘सोहम’ या ज्येष्ठ व्यक्तींच्या निवासस्थानी ज्येष्ठ गायकांच्या सहभागाचा खास दिवाळीनिमित्त हिंदी-मराठी गीतांचा हा ‘उत्सवी सूर’ कार्यक्रम होता. अ‍ॅड. भानुदास व डॉ. शिला कुळकर्णी यांच्या संकल्पना-आयोजनासह यावेळी २० अमिट गीते सादर करण्यात आली. रोजच्या दैनंदिन व्यवहारात संगीताचे सूर मनात जपणाऱ्या या गायकांच्या स्वरांना प्रतिष्ठित व्यासपीठ प्रदान करण्याचा हा स्तुत्य उपक्रम होता. मनाची प्रसन्नता गडद झालेल्या या गायकांनी अतिशय उत्साहात सादर केलेल्या गीतांना श्रोत्यांचाही भरगच्च प्रतिसाद लाभला. प्रत्येक गीताला उचलून धरणाऱ्या वादकांचा सुरेल स्वरमेळ व गायकांना प्रोत्साहित करणारे आकाशवाणीच्या निवेदिका श्रद्धा भारद्वाज यांचे नेटके निवेदन या कार्यक्रमाच्या प्रशंसनीय बाजू होत्या. डॉ. मोहन, कृष्णा कपूर, प्रभा घुले, डॉ. प्रफुल्ल मोकदम, नीलिमा मोहिते, डॉ. शनवारे, नंदू अंधारे, वैशाली पावनसकर, सुधीर मेश्राम, मोकदम मॅडम, प्रकाश खोत, डॉ. शिला कुळकर्णी, त्रिभुवन मेश्राम, डॉ. मोहन सुभेदार, अरुण नलगे, उदय लाडसावंगीकर यांनी गाणी तयारीने सादर केली. सूर निरागस हो, मुझे किसीसे प्यार हो गया,ऑसमा पे है खुदा, कहना है, बलमा मानेना, मधुबन में राधिका, जाता कहाँ है दिवाने... अशा गीतांचा हा कार्यक्रम होता. अ‍ॅड. भानुदास कुळकर्णी, सचिन बक्षी, गोविंद गडीकर, पंकज यादव, सुभाष वानखेडे, अजित पाध्ये व गौरव टांकसाळे यांनी सहवादन केले.
स्वराजितातर्फे रंगली शास्त्रीय रागसंगीताची सुरेल मैफिल 

अगदी प्राचीन काळापासून भारतीय जीवन व संस्कृतीशी एकरूप झालेल्या संगीताचे सूर प्रत्येक उत्सवाशी एकरूप झाले आहेत. दीपावलीच्या आनंदाला, उत्साहाला म्हणूनच मधूर शब्द सुरांचे दीप सर्वदूर तेजाळत असतात. स्वराजिताच्यावतीने दीपावली पर्वावर खास सकाळच्या शास्त्रीय संगीताच्या ‘प्रभात किरण’ या कार्यक्रमाचे आयोजन झाले. श्रीमंत धनवटे सभागृह, शंकरनगर येथे डॉ. सानिका रुईकर, डॉ. दीपा धर्माधिकारी, वंदना देवधर, अनुराधा पाध्ये, विशाखा मंगदे, नीरजा वाघ या गायिकांनी वेगवेगळ्या राग, बंदिशी, दादरा, तराणा अशांसह हा नादसोहळा रंजकतेने सादर केला. अतिशय तसेज स्वरांच्या पहाटेच्या सूर्याेदयाचे रंग उधळणाºया भटियार राग ‘आयो प्रभात सब मिल गाओ, बजाओ, नाचे हरि को रिझाओ’ या प्रसन्न बंदिशीसह सानिकाने गायनाची सुरुवात केली. आर्जवक स्वरसमूहाच्या राग बिलासखानी तोडीतील ‘जा जा रे कगवा पिया का संदेसा लेता जा’ ही विरही प्रियेच्या मनातील भाव अधोरेखांकित करणारी बंदिश दीपाने सादर केली. ‘राग नटभैरव’ अनुराधाने तर ‘बैरागी भैरव’ विशाखाने सादर केला. विख्यात कलाकार पं. रविशंकर यांनी तयार केलेल्या परमेश्वरी या रागातील ‘देवी दयानी भगवती शारदे सरस्वती परमेश्वरी’ ही सुरेख बंदिश वंदनाची पेशकश झाली. तर, विविध रागांची मनोहारी अशी रागमालिका वंदना, नीरजा व सानिकाने सादर केली. शिवाय, ‘सैया मोरा रे’ ही रसिली ठुमरी नीरजाने, तर समापनाची रािगणी भैरवी ‘प्रियदर्शनी दयानी भवानी’ हे विशाखा, अनुराधा व दीपाने सुस्वरात सादर केली. निवेदन सायली पेशवे यांचे होते. तबल्यावर राम ढोक, संवादिनीवर अमोल उरकुडे यांनी सहसंगत केली.

Web Title: Happy Diwali, Diwali with a harmonious dawn ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.