शुभ गुढीपाडवा; खरेदीला नवचैतन्याचा गोडवा, कोट्यवधींची उलाढाल होणार
By मोरेश्वर मानापुरे | Published: March 21, 2023 03:34 PM2023-03-21T15:34:21+5:302023-03-21T15:34:46+5:30
सराफा, आॅटोमोबाईल, गृहोपयोगी व इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट बाजारात प्रचंड उत्साह
नागपूर : मराठी नववर्षदिन आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा गुढीपाडव्यानिमित्त विविध बाजारपेठा सजल्या आहे. सराफा, आॅटोमोबाईल, गृहोपयोगी व इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. व्यापाºयांनी शोरूमही पारंपरिक पद्धतीने सजविल्या आहेत. सर्वच बाजारपेठांमध्ये विविध आॅफर्सची रेलचेल आहे. या शुभमुहूर्तावर खरेदीसाठी नागरिक सज्ज आहेत. गुढीपाडव्याला सर्वच बाजारपेठांमध्ये २०० कोटींची उच्चांकी उलाढाल होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.
गुढीपाडव्यानिमित्त सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी, चारचाकी यांच्यासोबतच घरखरेदी आणि रियल इस्टेट, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांचे प्राधान्य दिसून येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेतेही सज्ज झाले असून, वेगवेगळ्या सवलत योजना जाहीर झाल्या आहेत. शुभमुहूर्तावर सर्व बाजारपेठांमधील शोरूम सजल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने आघाडीवर असून एलईडी टीव्ही, फ्रीज, एसी अशा विविध वस्तूंमध्ये गुंतवणूक होण्याचा अंदाज विक्रेत्यांना आहे.
सराफ बाजारही सज्ज
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर थोडं सोने घेणे शुभ मानले जाते. या पार्श्वभूमीवर सराफ बाजार सज्ज झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार रुपयांवर गेले आहेत. नागपूर सराफा असोसिशननचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. ग्राहकांच्या आवडीनुसार आकर्षक व अनोख्या डिझाईनचे नेकलेस, रिंग, बांगड्या, अंगठी, ब्रेसलेट, नेकलेस, लॉकेट यांच्यासोबतच सुवर्ण नाणी घेण्यास ग्राहक प्राधान्य राहील. या दिवशी सराफा बाजारात कोट्यवधींच्या उलाढालीची अपेक्षा आहे.