हापूसची तहान बैगनपल्लीवर; अवकाळी पावसामुळे दर्जा घसरला
By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 24, 2023 19:06 IST2023-04-24T19:06:05+5:302023-04-24T19:06:33+5:30
Nagpur News यंदा अवकाळी पावसामुळे आंब्याचा दर्जा घसरला असून ठोकमध्ये दर्जानुसार १० ते ४० रुपये किलो भाव आहेत. रत्नागिरीचा हापूस ८०० रुपये डझन आहे.

हापूसची तहान बैगनपल्लीवर; अवकाळी पावसामुळे दर्जा घसरला
नागपूर : अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या विक्रीत वाढ होते. सर्वाधिक विक्रीचा बैगनपल्ली आंब्याचे १८० ते २०० मिनी ट्रक (प्रत्येकी ३ ते ४ टन) कळमन्यात दररोज विक्रीसाठी येत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत आवक वाढली आहे. यंदा अवकाळी पावसामुळे आंब्याचा दर्जा घसरला असून ठोकमध्ये दर्जानुसार १० ते ४० रुपये किलो भाव आहेत. रत्नागिरीचा हापूस ८०० रुपये डझन आहे. जास्त भावामुळे नागरिकांना हापूसची तहान बैगनपल्लीवर भागवावी लागत आहे.
नागपुरात आंध्रप्रदेशातील बैगनपल्ली आंब्याला सर्वाधिक मागणी आणि पसंती असून तेलंगना आणि आंध्रप्रदेश राज्यातून येतात. प्रारंभी ५० ते ६० रुपये भाव होते. आवक वाढल्यानंतर भाव कमी झाले. बैगनपल्लीची आवक मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ज्यावर्षी चिंच उत्पादनाचे प्रमाण कमी असते, त्यावर्षी आंबे जास्त प्रमाणात येतात, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार यंदा कळमन्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाव कमी असल्यामुळे घरोघरी आमरसाचा पाहुणचार सुरू आहे. किरकोळ बाजारात बहुतांश हातगाड्यांवर बैगनपल्लीची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.
दशेरी, तोतापल्ली, लंगडा आंब्याची सोमवारपासून विक्री
अक्षयतृतीयेनंतर कळमन्यात सोमवारी पहिल्या दिवशी लोकल दशेरी, तोतापल्ली आणि गावरानी लंगडा आंब्याची विक्री सुरू झाली. याआधी आंध्रप्रदेशातून येणारा तोतापल्ली आंब्याची आवक संपली आहे. आता भिवापूर, मांढळ, कुही, तुमसर, गोंदिया, वरूड येथून आवक सुरू झाली आहे. कळमन्यात लोकल दशेरी आंबा ८० रुपये, गावरानी लंगडा ३० ते ६० रुपये आणि तोतापल्लीचे २० ते ३० रुपये किलो भाव आहेत. सोमवारी तिन्ही प्रकारच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगिले.
केशर आंबा ६० ते ८० रुपये किलो
कळमन्यात केशर आंब्याची आवक सुरू आहे. आंध्रप्रदेशातील केशर आंबा ६० ते ७० रुपये आणि गुजरातचा केशर आंबा ८० रुपये किलो आहे. गुजरातचा केशर १० किलो पॅकिंगमध्ये येतो.
रत्नागिरीचा हापूस खातोय भाव
हापूस हा आंब्याचा राजा समजला जातो. नागपुरात या आंब्याची खरेदी करणारा विशेष वर्ग आहे. कळमन्यात दररोज डझनाच्या १०० पेट्यांची आवक आहे. दर्जानुसार भाव ७०० ते ८०० रुपये आहेत.
आवक वाढली; भावही उतरले
सध्या बैगनपल्ली, केशर, दशेरी, तोतापल्ली, गावरान लंगडा, केशर आणि हापूस आंब्याची सुरू आहे. यंदा आवक जास्त असल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. सर्वाधिक विक्रीचा बैगनपल्लीची आवक तेलंगना आणि आंध्रप्रदेशातून होत आहे. मे महिन्यात भाव कमी होतील.
आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फळे बाजार असोसिएशन.