‘हर घर तिरंगा’; नागपुरात २ लाख विद्यार्थांना झेंड्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2022 08:05 PM2022-08-09T20:05:55+5:302022-08-09T20:06:38+5:30
Nagpur News आतापर्यंत नागपूर शहरातील विविध शाळांमध्ये २ लाख विद्यार्थ्यांना तिरंगा झेंडा वाटप करण्यात आला आहे.
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण नागपूर शहरामध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियान १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये उत्साहात राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे आतापर्यंत नागपूर शहरातील विविध शाळांमध्ये २ लाख विद्यार्थ्यांना तिरंगा झेंडा वाटप करण्यात आला आहे.
नागपूर शहरातील १३० महानगरपालिकेच्या शाळांतील १५ हजार विद्यार्थांचा यात समावेश आहे. अभियानासाठी, प्रशासनातर्फे २३ केंद्रीय शाळा पथकाद्वारे तिरंगा वाटप केला जात आहे. या अभियानाद्वारे नागपूर शहरातील सुमारे ६ लाख घरांवर तिरंगा फडकाविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, यासाठी केंद्रीय शाळा पथकाद्वारे शाळांमध्ये जाऊन, विद्यार्थ्यांना तिरंगा वाटप केले जात आहे. नागपूर शहरातील मनपा शाळा, खाजगी शाळांचे ४ लाख विद्यार्थी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होणार आहेत, तसेच नागरिकांना मनपाद्वारे स्वस्त दरात झेंडा उपलब्ध करून दिला जात आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शहरातील प्रमुख ७५ चौकांत, रोशनाईसुद्धा करण्यात आली आहे. शहरातील सर्व शाळांमध्ये तिरंगा वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे.