ऑनलाईन परिक्षेने विद्यार्थी हैराण; नेटवर्कने उडवली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 06:35 PM2021-03-25T18:35:27+5:302021-03-25T18:35:52+5:30
अनेकांनी सोबत डबा आणलेला नव्हता. 11 वाजेपर्यंत ताटकळत बसल्यानंतर आलेल्या मेसेजने त्यांना काय करावे सुचत नव्हते. इतका वेळ नेमका घालवायचा कुठे? पोटाची सोय कुठे करायची? तसेच कोरोनाचा काळ असल्याने कोणाकडे तरी कसे जावे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांपुढे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: रा. तु. म. वि. नागपूर तर्फे बीकॉम. तृतीय वर्षाच्या ऑनलाइन पेपरला आज पासुन सुरुवात होणार होती. हा पेपर 8 ते 11 या वेळेत ऑनलाइन पदधतीप्रमाणे होणार होता.जिथे चांगले नेटवर्क असेल तिथून विद्यार्थ्यांना तो सोडविता येणार असल्याने बाहेरगावच्या विद्यार्थ्यानी काटोलकडे धाव घेतली. दिलेल्या वेळेत पेपर सोडविण्याचा प्रयत्न करताना विद्यार्थ्यांना सतत सर्व्हर एरर दाखवत होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी घाबरले व त्यांनी मित्रांशी संबंध साधला असता मित्रांची देखिल हीच स्थिती होती. सततच्या सर्व्हर एररने विद्यार्थ्यांची भंबेरी तर उडालीच पण काहींची बॅटरी देखील उतरली. काहींना नेटवर्कची समस्या सतावीत होती. तसेच विद्यापीठाच्या साईटने देखील अनेकांना त्रास झाला.
काही वेळानी विद्यार्थ्यांच्या मोबाईल वर मेसेज आला की तुम्ही 5 वाजे पर्यंत पेपर सोडवू शकता. आता मात्र विदयार्थी अजूनच गोंधळले. बाहेर गावचे विदयार्थी सकाळ पासून पेपरसाठी काटोलला आलेत. येताना अनेकांनी सोबत डबा आणलेला नव्हता. 11 वाजे पर्यंत ताटकळत बसल्यानंतर आलेल्या मेसेजने त्यांना काय करावे सुचत नव्हते. इतका वेळ नेमका घालवायचा कुठे? पोटाची सोय कुठे करायची? तसेच कोरोनाचा काळ असल्याने कोणाकडे तरी कसे जावे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांपुढे होते.
वेळेवर झालेल्या फजितीने आम्ही काय करावे? आणि आमचा हा पेपरचा प्रश्न लवकर सुटावा अशी मागणी साक्षी धोटे, राणी बोंद्रे, रवीना भांडवलकर, प्रगती डोंगरे, संगीता अंबुढारे ,आचल आगरकर अभिमन्यू देशमुख या विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना केलेली आहे.
विद्यार्थी प्रतिक्रिया-
सतत होणाऱ्या सर्वर डाऊन मुळे माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्णपणे डाऊन झालेली होती तेव्हा काय करावे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला होता. या समस्येवर लवकरात लवकर उपाय काढावा.
- मानसी मखेजा (बीकॉम तृतीय वर्ष)
मी कारंजा मार्गे मूर्ती गावाजवळ राहत असल्याने माझ्या गावात नेटवर्कची समस्या असते त्यामुळे मी सकाळीच पेपर साठी काटोल येथे आली .आल्यावर जो काही प्रकार घडला त्यामुळे माझ्यासारख्या खेड्यापाड्याच्या विद्यार्थ्यांना फार त्रास सहन करावा लागला. यावर लवकरात लवकर उपाय शोधून आमच्या पेपरचा प्रश्न लवकर सोडवावा.
- किरण सोहलिया( बीकॉम तृतीय वर्ष)