मेयोमध्ये महिला गार्डची छेडखानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:11 AM2021-09-09T04:11:22+5:302021-09-09T04:11:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेयो रुग्णालयात कार्यरत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलाच्या महिला गार्डची सुपरवायझरने छेडखानी केल्याचा प्रकार उघडकीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयो रुग्णालयात कार्यरत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलाच्या महिला गार्डची सुपरवायझरने छेडखानी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे मेयो रुग्णालयात खळबळ उडाली आहे. तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राजू पाटील (४५) असे आरोपीचे नाव आहे. पीडित २८ वर्षीय युवती मेयोमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. आरोपी राजू पाटील हा सुपरवायझर आहे. सूत्रानुसार पाटील अनेक दिवसांपासून पीडित युवतीला त्रास देत होता. सुटी मागितली तर त्रास देणे, आपत्तीजनक वर्तन करणे असे प्रकार सुरू हाोते. ५ सप्टेंबर राेजी दुपारी पाटीलने पीडित युवतीशी आपत्तीजनक वर्तन केले. सुपरवायझर असल्याने पाटीलचा विभागात दबदबा असल्याने ती काही करू शकली नाही. परंतु तिने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी अगोदर तक्रारीची चौकशी केली. पीडितेसह इतर महिला गार्डलाही विचारपूस केली. त्यानंतर तक्रारची पुष्टी होताच छेडखानी व धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार पाटीलच्या वर्तणुकीने इतर महिला कर्मचारीही संतप्त आहेत. त्यासुद्धा तक्रार करण्यास पुढे येण्याची शक्यता आहे. पीडित युवतीने जानेवारी महिन्यातही पाटीलच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तेव्हा त्याची बदली करण्यात आली होती. परंतु प्रभावशाली लोकांच्या दबावामुळे त्याला कार्यमुक्त करण्यात आले नाही. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. तिथे अशी घटना घडणे गंभीर आहे.