आईचाच छळ, घराबाहेर काढले दारुड्या पोराला कायद्याचा हिसका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:33 PM2023-11-27T12:33:15+5:302023-11-27T12:34:27+5:30
मातेने थेट पोलिसांकडे घेतली धाव: कुपुत्राविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे
नागपूर : कलियुगात पैशांवरून भाऊ भावाचा आणि पती पत्नीचा वैरी झाल्याचे दिसून येते. मात्र, अनेक कुपुत्र पैशांसाठी स्वत:च्या पालकांनादेखील घराबाहेर काढायला मागेपुढे बघत नाहीत. जिने लहानपणापासून घडविले आणि आधार दिला, तिलाच पित्याच्या मृत्यूनंतर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत निराधार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नालायक कार्ट्याला अखेर मातेनेच जन्माची अद्दल घडविली. सातत्याने त्याचा छळ सहन करणाऱ्या आईच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि तिने अखेर मुलाविरोधातच पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.
पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. प्रेमलता तिवारी (६०, लष्करीबाग) असे संबंधित दुर्दैवी मातेचे नाव आहे. प्रेमलता यांना तीन मुली व सागर (३२) हा मुलगा आहे. सागर हा काहीच काम करत नाही व त्याला दारूचे व्यसन आहे. प्रेमलता यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या मुलगा सागरसोबतच राहतात. त्यांच्या पतीच्या पेन्शनवरच घर चालते. तीनही मुलींची लग्ने झाली असून त्या त्यांच्या परिने मदत करत असतात. मात्र, मुलगा काहीच काम करत नसल्याने प्रेमलता तशाच चिंतेत असतात. सागरला दारूचे इतके व्यसन आहे की त्याने त्यासाठी अनेकांकडून पैसे उधार घेतले आहेत. दारूच्या नशेत त्याने अनेकदा आईकडे पैसे मागितले व त्यांना शिवीगाळ करत मारहाणदेखील केली. बऱ्याच वेळा तर त्यांना जेवणदेखील करू दिले नाही. जर प्रेमलता यांनी पैसे देण्यास नकार दिला तर तो त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी द्यायचा.
२१ नोव्हेंबर रोजी तो दारूच्या नशेत घरी आला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली व आईला घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. तू घराबाहेर गेल्यावर मी लग्न करेन असे म्हणत त्याने त्यांना झाडूने मारहाण केली. बेदम मारहाण केल्यावर त्याने वृद्ध आईला घराबाहेर काढले. या घटनेमुळे हादरलेल्या प्रेमलता यांनी त्यांच्या मुलींना फोन करून ही माहिती दिली. मुली तातडीने तेथे पोहोचल्या. आईचा सातत्याने छळ होत असल्याचे पाहून त्यांच्या डोळ्यातूनदेखील पाणी येत होते. मुलाला सुधारण्याचे खूप प्रयत्न केल्यावरदेखील काहीच फरक पडत नसल्याचे पाहून अखेर प्रेमलता यांनी कठोर मन केले व थेट पाचपावली पोलिस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी पोलिसांना आपबिती सांगितली व स्वत:च्याच मुलाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी सागरविरोधात ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.
कायद्याचा आधार घ्या
आई-वडिलांची संपत्ती मिळविण्यासाठी किंवा त्यांना दूर घालविण्यासाठी अनेक मुले त्यांना घराबाहेर काढतात. तर बरेच जण अनन्वित अत्याचार करतात. अशा आईवडिलांनी थेट कायद्याचा आधार घेत मुलांविरोधात पोलिस तक्रार केली पाहिजे. कायद्याच्या धाकानेच अनेकदा अशी मुले वठणीवर येतात.