अट्टल गुन्हेगारांची टोळी गजाआड : चौकीदारावर केला होता प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:01 PM2019-07-29T23:01:46+5:302019-07-29T23:03:32+5:30
चौकीदारावर प्राणघातक हल्ला करून एका खोलीत फेकून दिल्यानंतर त्या घरातील मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चौकीदारावर प्राणघातक हल्ला करून एका खोलीत फेकून दिल्यानंतर त्या घरातील मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
मनोज शालिकराम धुर्वे (वय २९, रा. आनंदनगर, जयताळा), शुभम विनय पाठक (वय २५, रा. सुदामनगरी, पांढराबोडी), अशी या टोळीतील गुन्हेगारांची नावे असून, त्यांच्यासोबत त्यांचे दोन अल्पवयीन साथीदारही आहेत.
केसरी ले-आऊट जयताळा येथील रहिवासी बाळकृष्ण भुरेवार १० मार्चला घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेथे शिवमोहन तिवारी (वय ५८) हे चौकीदारी करीत होते. पहाटेच्या वेळेस आलेल्या गुन्हेगारांनी तिवारी यांना लोखंडी रॉडने जोरदार मारहाण केली. ते मृत झाल्याचे समजून त्यांना फरफटत नेऊन एका खोलीत फेकले आणि घरातील टीव्हीसह ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. आरोपींनी भुरेवार यांची कारही तेथून चोरून नेली. मात्र, काही अंतरावर कार बंद पडल्याने ती तशीच सोडून आरोपी चोरलेले साहित्य घेऊन पळून गेले. कोमात गेलेल्या तिवारींवर प्रदीर्घ उपचार करून डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचविला. दरम्यान, एमआयडीसीत याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करीत होते. रविवारी पोलिसांना जयताळ्यातील बाजारात एका पल्सरवर कुख्यात मनोज धुर्वे आणि शुभम पाठक दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी बोलते केले असता, ती पल्सर चोरीची असल्याचे तसेच १० मार्चला भुरेवार यांच्याकडे चौकीदार तिवारींना बेदम मारहाण करून चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे साहित्य काढून देतानाच त्यांनी या गुन्ह्यासह एमआयडीसी, प्रतापनगर आणि सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी तसेच वाहनचोरीचे एकूण सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. आपल्या अल्पवयीन साथीदाराचेही नाव आरोपींनी पोलिसांना सांगितले.
२७ गुन्ह्यांचा आरोपी
कुख्यात मनोज धुर्वे हा अल्पवयीन असतानाच गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्याच्यावर लुटमार, चोरी, घरफोडीचे एकूण २७ गुन्हे, तर शुभम पाठकविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी पकडल्यानंतरही ते सहजासहजी गुन्ह्यांची कबुली देत नाही.
त्यांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, सहायक निरीक्षक प्रशांत चौगुले, उपनिरीक्षक वसंता चौरे, श्रीनिवास मिश्रा, हवलदार नरेश सहारे, नरेश रेवतकर कृपाशंकर शुक्ला, आशिष ठाकरे, रवींद्र बारई, आशिष देवरे, शिपायी सुशील श्रीवास, मंगेश मडावी, देवीप्रसाद दुबे आणि सायबर शाखेचे सुहास शिंगणे तसेच आशिष पाटील यांनी बजावली.