सीए परीक्षेत हार्दिक दारा नागपूर सेंटरमध्ये अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 11:01 AM2023-07-06T11:01:31+5:302023-07-06T11:01:50+5:30
आयसीएआयचे निकाल घोषित, दीपेश द्वितीय, अथर्व तृतीय स्थानी, ३१ विद्यार्थी उत्तीर्ण
नागपूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) बुधवारी सीए इंटरमिजिएट आणि अंतिम वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये आयसीएआयच्या नागपूर शाखेतून अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या ३०० पैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सीए बनले आहेत. यापैकी हार्दिक सुधीर दारा हा विद्यार्थी नागपूर शाखेत अव्वल राहिला. त्याने ८०० पैकी ४५९ गुण मिळविले.
दुसऱ्या स्थानी दीपेन सुरेश नागदेव हा विद्यार्थी असून त्याने ४४८ गुण, अथर्व मिलिंद मारपट्टीवारने ४३२ गुणांसह तिसरे स्थान, रोहित रवींद्र तुपाटने ४२७ अंकासह चवथे आणि श्रावणी दीपक उत्तरवार या विद्यार्थिनीने ४२३ गुणांसह पाचवे स्थान मिळविले आहे. या प्रकारे इंटरमिजिएट परीक्षेत ४४३ पैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इंटरमिजिएट परीक्षेत मयूरेश केळापुरे हा विद्यार्थी ८०० पैकी ५४५ गुण मिळवीत नागपूर सेंटरमध्ये पहिला आला आहे. दुसऱ्या स्थानावर भावेश गोयल (५४२), तिसरा धीरज जग्याशी (५३८), चवथा अथर्व तिडके (५१८) आणि रोली अग्रवालने ५१७ गुण मिळवित पाचवे स्थान पटकाविले.
देशात सीए अंतिम वर्षाची परीक्षा २५,८४१ विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी २१५२ विद्यार्थी अर्थात ८.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ग्रुप ‘ए’चा ११.९१ टक्के आणि ग्रुप ‘बी’चा ३१.४३ टक्के निकाल लागला. देशात एकूण ३९,१९५ विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएटची परीक्षा दिली होती. यापैकी ४०१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल १०.२४ टक्के लागला. इंटरमिजिएट परीक्षेत ग्रुप ‘ए’मध्ये १ लाख ७८१ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये १९,१०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल १८.९५ टक्के लागला. ग्रुप ‘बी’मध्ये ७१,९५६ पैकी १९,२०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल २३.४४ टक्के लागला.