गृहिणींच्या मदतीसाठी धावून आलीय ‘हरीभरी’; भाजीपाल्याचा 'रेडी टू कूक' फंडा, संकल्पना घराघरांत
By मंगेश व्यवहारे | Published: September 12, 2023 12:19 PM2023-09-12T12:19:25+5:302023-09-12T12:22:08+5:30
अबोली सोनोलेंचा गृहीणींसाठी वेळ वाचवण्याचा पर्याय
मंगेश व्यवहारे
नागपूर : गृहिणींना स्वयंपाक करताना भाज्या निवडणे, तोडणे, सोलण्याचा कधीतरी कंटाळा येतो. मेथी, चवळी तर नाकात दम आणते. या भाज्या तोडलेल्या, चिरलेल्या सहज मिळाल्या तर? नागपुरात ‘हरीभरी’ ह्या भाज्या छान तोडून, निवडून, चिरून आणि स्वच्छ करून देतोय आणि त्याही विषमुक्त म्हणजे सेंद्रिय शेतीतून उगविलेल्या. सध्या शहरातील १५० घरांत ह्या भाज्या ‘हरीभरी’च्या माध्यमातून नियमित शिजताहेत. या माध्यमातून हरीभरी ही गृहिणींच्या मदतीसाठी तर धावून आलीच आहे; पण ती लोकांचे आरोग्यही जपतेय.
हरीभरी ही संकल्पनाच अबोली सोनोले या गृहिणीची आहे. ‘हरीभरी... रेडी टू कुक’ या नावाने त्या हा उपक्रम राबवून शेतकरी आणि ग्राहकांना थेट कनेक्ट करतात. अबोली सोनोले ह्या शहरातील स्वावलंबीनगर भागात राहणाऱ्या. घरात नोकरचाकर सगळेच. वरून त्या स्वत: गृहिणी. तरीही नियमित भाज्या निवडणे, सोलणे, तोडणे होत नव्हते. बऱ्याचदा कंटाळा आला की कशातरी चिरचार, तोडताड करून एकदा भाजी झाली की समाधान. अबोली सोनोले यांनी हाच धागा इतर महिलांच्या बाबतीत जोडला.
विशेष म्हणजे नोकरी-व्यवसाय करणाऱ्या गृहिणींना भाजी तोडणे, चिरणे किती कंटाळवाणे होत असेल, हे त्यांच्या लक्षात आले. सोबतच आरोग्याच्या बाबतीत अनेकजण सजग झाले आहे. विषमुक्त भाजीपाला, फळ मिळावे यासाठी लोकांची धडपड असते. या दोन्हींवर मंथन करून त्यांनी स्वत:च्या शेतात आठ एकरांमध्ये विषमुक्त भाजीपाला पिकविला. सुरुवातीला हा भाजीपाला बाजारपेठेत विकायला जायचा; पण त्याला सामान्य ग्राहकांकडून दर मिळत नव्हता. अखेर त्यांनी घरोघरी ‘रेडी टू कुक’ भाजीपाला उपलब्ध करून देण्याची शक्कल लढविली.
पाच महिन्यांपूर्वी त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. ग्रामीण भागातील महिलांना हाताशी धरले. शेतातच एक युनिट तयार केले. तिथे शेतात निघणारा भाजीपाला स्वच्छ धुऊन, चिरून, तोडून, निवडून शहरातील ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवून दिला. लोकांना तो आवडायला लागला. हळहळू ग्राहक वाढले, त्यामुळे जवळपासच्या शेतकऱ्यांना त्यांनी विषमुक्त भाजीपाला पिकविण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. आज शहरातील १५० घरी त्यांचा ‘हरीभरी... रेडी टू कुक’ या नावाने भाजीपाला जात आहे.
३ हजारांत महिन्याभराचा विषमुक्त भाजीपाला थेट घरी
अबोली यांच्याकडे ४० च्या जवळपास भाज्या मिळतात. ग्राहकांकडून आठवड्याभरात आवडत्या भाज्यांची लिस्ट घेतात. त्याचा डाटाबेस तयार केला आहे. आठवड्यात दोन दिवस ग्राहकांना भाज्यांची डिलिव्हरी देतात. चिरून, सोलून, कापून असलेल्या भाज्यांमध्ये लसूण, आले, मिरची, कोथिंबीर यांचीही गरज असते. सोबतच सॅलड म्हणून गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, बीट हेदेखील भाज्यांसोबत त्या पुरवितात. महिन्याभरात आठ वेळा घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी महिन्याला त्या तीन हजार रुपये घेतात.
- भाजी खराब निघाली तर एक पॅकेट फ्री
ग्राहकांना भाजीचा पुरवठा करताना त्या प्रचंड स्वच्छता पाळतात. भाज्यांचे व्यवस्थित पॅकेजिंग करतात. तरीही भाजी खराब निघाल्यास त्या ते पॅकेट परत घेऊन नवीन पॅकेट फ्री देतात. ५ महिन्यांत फक्त एक ग्राहक वगळता भाजी खराब निघाल्याची तक्रार आली नाही. फक्त एकाच ग्राहकाकडून भाजीत केस निघाल्याच्या चार तक्रारी आल्या. त्याचा शोध घेतल्यावर लक्षात आले की, बाजारातून नेहमीच भाजी आणायला जाणाऱ्या कामवाल्या बाईचे वरचे कमिशन त्यांच्या उपक्रमामुळे बंद झाले होते. त्यानंतर अशी तक्रार त्यांच्याकडून आली नाही.
यातून भरपूर लाभ मिळावा हा माझा हेतू नाही. लोकांचे आरोग्य आणि ग्रामीण भागातील महिलांना चांगला रोजगार मिळावा हा प्रयत्न आहे. माझ्याकडे असलेल्या १५० ग्राहकांमध्ये डॉक्टर्स, वकील, शिक्षक, बॅँकर्स अशा अप्पर मिडल क्लास वर्गांतील ग्राहक आहेत. या दीडशेही गृहिणी हरीभरीमुळे समाधानी आहेत.
- अबोली सोनोले, संचालक, हरीभरी... रेडी टू कुक