हर्षा व मिडास हॉस्पिटलचे डॉक्टर वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 09:13 PM2018-06-28T21:13:51+5:302018-06-28T21:15:58+5:30
महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने धरमपेठेतील स्वामी आर्केडस्थित हर्षा चिल्ड्रेन हॉस्पिटल अॅन्ड मॅटेर्निटी होमचे डॉ. विद्या व डॉ. भूषण सुतावणे, रामदासपेठेतील मिडास हाईटस् हॉस्पिटलचे डॉ. राजन बारोकर आणि अॅनेस्थेटिस्ट डॉ. मनीषा काटे यांना वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी ठरवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने धरमपेठेतील स्वामी आर्केडस्थित हर्षा चिल्ड्रेन हॉस्पिटल अॅन्ड मॅटेर्निटी होमचे डॉ. विद्या व डॉ. भूषण सुतावणे, रामदासपेठेतील मिडास हाईटस् हॉस्पिटलचे डॉ. राजन बारोकर आणि अॅनेस्थेटिस्ट डॉ. मनीषा काटे यांना वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी ठरवले आहे. या डॉक्टर्सनी संयुक्त किंवा विभक्तपणे तक्रारकर्त्यांना ९ टक्के व्याजासह २५ लाख रुपये भरपाई द्यावी असा आदेश आयोगाने दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्यांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी एक लाख व तक्रारीच्या खर्चापोटी २५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
खंडपीठाचे अध्यक्ष बी. ए. शेख व सदस्य जयश्री येंगल यांनी हा निर्णय दिला आहे. डॉ. प्रमोद, हेमांगी व हिमांशू अमोदकर अशी या निर्णयामुळे दिलासा मिळालेल्या तक्रारकर्त्यांची नावे आहेत. २५ लाख रुपयांवर १६ जुलै २००९ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंतच्या कालावधीत व्याज लागू करण्यात आले आहे. डॉक्टर्सच्या निष्काळजीपणामुळे २८ वर्षीय प्रणिता अमोदकर यांचा मृत्यू झाला. त्या जळगाव येथे प्राध्यापक होत्या व बाळंतपणासाठी नागपूर येथे माहेरी आल्या होत्या. त्यांचे प्रमोद हे पती तर, हेमांगी व हिमांशू ही अपत्ये आहेत. आयोगात तक्रारकर्त्यांतर्फे अॅड. विवेक केदार यांनी बाजू मांडली.
अशी घडली घटना
प्रणिता यांना १६ जुलै २००७ रोजी बाळंतपणासाठी हर्षा हॉस्पिटलमध्ये भरती करून घेण्यात आले होते. सिझेरियन केल्यानंतर त्यांनी एक मुलगा व एक मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यानंतर प्रणिता यांना श्वास घेण्यास अडचण होत होती व अस्पष्ट दिसत होते. परंतु, तक्रारीनंतरही डॉक्टर्सनी त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही. प्रकृती अधिक खराब झाल्यानंतर प्रणिताला मिडास हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात आले. दरम्यान, नातेवाईकांनी डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार हजारो रुपयांची आवश्यक औषधे खरेदी केली. शेवटी त्याचा काहीच फायदा झाला नाही. १९ जुलै रोजी प्रणिताने जगाचा निरोप घेतला.