हर्षिनी कान्हेकर झाल्या पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:16 PM2018-01-05T23:16:45+5:302018-01-05T23:30:45+5:30
नागपूरकर हर्षिनी कान्हेकर या देशाच्या पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी झाल्या आहेत. त्यामुळे उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपूरकर हर्षिनी कान्हेकर या देशाच्या पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी झाल्या आहेत. त्यामुळे उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने २० जानेवारी रोजी राष्ट्रपती भवन येथे विविध क्षेत्रावर प्रथमच नाव कोरणाऱ्या देशातील ११३ महिलांना सन्मानित केले जाणार आहे. त्यात कान्हेकर यांचाही समावेश आहे. त्यांनी २००६ मध्ये नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून बी. ई. पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांची मुंबईतील ओएनजीसी येथे अग्निशमन अधिकारीपदी निवड करण्यात आली. कान्हेकर यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना अलीकडेच नीती आयोग व संयुक्त राष्ट्र यांच्यातर्फे ट्रान्सफार्मिंग वूमन आॅफ इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंबाझरी येथील वर्मा ले-आऊटमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. त्यांचे वडील पाटबंधारे विभागात कार्यरत होते. यापूर्वी मदर टेरेसा, कल्पना चावला, बछेंद्रीपाल, ऐश्वर्या राय, पी. व्ही. सिंधू, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी जगप्रसिद्ध महिलांना त्या-त्या क्षेत्रातील प्रथम महिलेचा पुरस्कार मिळाला आहे.
उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष नको
महिलांनी उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन हर्षिनी कान्हेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. कुटुंबातून सतत उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळत होती. त्यामुळे आज या स्थानावर पोहोचू शकले, असे त्यांनी सांगितले व प्रथम महिला पुरस्कार मिळत असल्यामुळे आनंद व्यक्त केला.