हर्षच्या मृत्यूची चौकशी सुरू
By admin | Published: August 25, 2015 03:51 AM2015-08-25T03:51:59+5:302015-08-25T03:51:59+5:30
खुल्या वायरचा करंट लागल्यामुळे मृत झालेल्या हर्ष दीपक ललके (वय १३) या बालकाच्या मृत्यूला नेमका कुणाचा
नागपूर : खुल्या वायरचा करंट लागल्यामुळे मृत झालेल्या हर्ष दीपक ललके (वय १३) या बालकाच्या मृत्यूला नेमका कुणाचा हलजर्गीपणा कारणीभूत आहे, त्याची चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सीताबर्डी पोलिसांनी सोमवारी संबंधित अधिकारी तसेच विद्युत निरीक्षकांना बोलवून घटनास्थळाची तसेच आजूबाजूच्या भागाची तपासणी करून घेतली.
रामदासपेठेतील सिम्स हॉस्पिटलमागे राहाणारा हर्ष रविवारी सकाळी मित्रांसोबत लेंड्रापार्क जवळच्या कॉर्पोेरेशन शाळेच्या आवारात खेळत होता. खेळताना थकल्यामुळे तो शाळेच्या चॅनल गेटजवळच्या ओट्यावर बसला. तेथे पडलेल्या वायरला त्याचा हात लागल्याने त्याला जोरदार करंट लागून त्याचा करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांच्या भावना संतप्त असून, हर्षच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे. हर्षच्या मृत्यू प्रकरणात कोण दोषी आहे, त्याची चौकशी सीताबर्डी पोलीस करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, पीएसआय पुरी यांनी सोमवारी सकाळी वीज मंडळाचे निरीक्षक, महापालिकेतील वीज विभागाचे अधिकारी आणि महापालिकेच्या रामदासपेठ भागातील अधिकाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळाचा पंचनामा करून वायरिंगची तपासणी करून घेतली. कुठून वीज प्रवाहीत झाली. वायर किती दिवसांपासून तुटून होती, आणखी असाच काही गैरप्रकार आहे का, त्याची जबाबदारी कुणावर होती, त्याची माहितीही जाणून घेतली.(प्रतिनिधी)
आर्थिक मदत मिळावी
४हर्षच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. त्याची आई वैशालीची प्रकृती अस्वस्थ आहे. दिलीप आणि वैशालीचा एकुलता एक मुलगा हर्ष कायमचा निघून गेल्यामुळे या दोघांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांनाही तीव्र दु:ख झाले आहे. हर्षचे वडील दिलीप आॅटोचालक आहेत. मुलाला मोठा अधिकारी बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, हर्ष सोबत ललके कुटुंबीयांच्या स्वप्नांचीही राखरांगोळी झाली. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हर्षचा करुण अंत झाला, अशी सार्वत्रिक भावना असून, ललके कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी शोकसंतप्त नागरिकांची मागणी आहे.