हिरवळ दाटे चोहीकडे ....

By Admin | Published: July 2, 2016 03:00 AM2016-07-02T03:00:57+5:302016-07-02T03:00:57+5:30

उपराजधानीत शुक्रवारी दिवसभर उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली. या एकाच दिवशी वन विभाग, सामाजिक वनीकरण, ...

Haruvar Date Choohake .... | हिरवळ दाटे चोहीकडे ....

हिरवळ दाटे चोहीकडे ....

googlenewsNext

उपराजधानीत १२ लाख ८२ हजार वृक्ष लागवड : विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी :
नागपूर : उपराजधानीत शुक्रवारी दिवसभर उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली. या एकाच दिवशी वन विभाग, सामाजिक वनीकरण, वन विकास महामंडळ व इतर शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था, निसर्ग संस्था, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये, एनएसएस, एनसीसीच्या सुमारे ७५ हजार ५०१ लोकांनी प्रत्यक्ष भाग घेऊन सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत १२ लाख ८२ हजार ९६८ झाडांची लागवड केली. विशेष म्हणजे, सर्व वृक्ष लागवड १ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. सकाळी ९ वाजता वन विभागाच्या अंबाझरी येथे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार प्रा. अनिल सोले, आ. प्रकाश जगभिये, विभागीय आयुक्त अनुपकुमार, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व्यवस्थापन) एस. एस. के. सिन्हा, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान, मनपा आयुक्त श्रवण हार्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. म्हसेकर व जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी भगत उपस्थित होत्या. दरम्यान अंबाझरी वनक्षेत्रात सुमारे १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच दिवसभर संपूर्ण शहरात अत्यंत उत्साहात झाडे लावण्यात आली. नागपूर जिल्ह्याला १३ लाख ५३ हजार ३२४ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातुलनेत दिवसभरात १२ लाख ८२ हजार झाडांची लागवड करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेचे वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने अचूक नियोजन केले होते. त्यामुळे राज्यभरात ही मोहीम यशस्वी ठरली. एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीच्या या कार्यक्रमासाठी वन विभाग मागील सहा महिन्यांपासून तयारी करीत होता. (प्रतिनिधी)

विद्यापीठात सप्तपर्णी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात हाती टाळ-मृदंग घेऊन, शहरात वृक्षदिंडी काढली होती. यातून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण मोहिमेसाठी वातावरण निर्मिती केली. यात शहरातील विविध महाविद्यालयातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ काणे यांनी या दिडींला रविनगर परिसरातील क्रीडा संकुल येथून हिरवी झेंडी दाखविली. यावेळी प्र-कुलगुरु प्रमोद येवले, कुलसचिव पुरण मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊ दायदार आदी उपस्थित होते. दरम्यान विद्यापीठ कॅम्पस आणि एलआयटी परिसरात एकूण ५२० झाडांची लागवड करण्यात आली, अशी माहिती विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक प्रवीण गोतमारे यांनी दिली. विद्यापीठात प्रामुख्याने सप्तपर्णी, गुलमोहर, कडुनिंब आदी झाडांची लागवड करण्यात आली.

Web Title: Haruvar Date Choohake ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.