अवैध दारूविक्रीला सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:09 AM2021-05-26T04:09:39+5:302021-05-26T04:09:39+5:30
चंदू कावळे लाेकमत न्यूज नेटवर्क टाकळघाट : औद्याेगिक वसाहतीमुळे टाकळघाट परिसरात लाेकसंख्येची घनता अधिक आहे. त्यामुळे या भागात छाेटे ...
चंदू कावळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
टाकळघाट : औद्याेगिक वसाहतीमुळे टाकळघाट परिसरात लाेकसंख्येची घनता अधिक आहे. त्यामुळे या भागात छाेटे माेठे उद्याेगधंदेही विकसित झाले असून, दारूची दुकाने व बीअरबारची संख्याही अधिक आहे. लाॅकडाऊनमुळे दारूची विक्री अर्थात पार्सल सेवा रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, टाकळघाट परिसरात रात्री उशिरापर्यंत देशी व विदेशी दारूची चढ्या दराने विक्री केली जात असल्याने या भागात अवैध दारूविक्रीला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. हा प्रकार एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांना माहिती असूनही ते बघ्याची भूमिका घेण्यात धन्यता मानत आहेत.
टाकळघाट (ता. हिंगणा) येथे देशी दारूची तीन दुकाने असून, चार बीअरबार आहेत. एमआयडीसी परिसरात विदेशी दारूचे एक व देशी दारूची दाेन दुकाने असून, सहा बीअरबार आहेत. या सर्व दुकाने व बारला रात्री ७ वाजेपर्यत पार्सलद्वारे दारूविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही अवैध दारूविक्रेत्यांनी याच काळात नवीन शक्कल लढविली आणि दारूविक्री सुरू केली. ते या दुकानांमधून दारूच्या बाटल्या खरेदी करतात. रात्री ७ वाजतानंतर ग्राहक हेरून ते त्या बाटल्यांची चढ्या दराने विक्री करतात.
त्यांचे काही ग्राहक ठरलेले असून, ते नवीन ग्राहकांच्या शाेधात परिसरात दारूच्या बाटल्या साेबत घेऊन फिरत असतात. काही दुकानदार आपल्याला रात्री ७ वाजतानंतरही दारूच्या बाटल्या विकत देत असल्याची माहिती या अवैध दारूविक्रेत्यांनी दिली. या दारूविक्रीबाबत पाेलिसांना माहिती आहे. मात्र ते मुद्दाम कारवाई करीत नसल्याचेही या अवैध दारूविक्रेत्यांनी बाेलण्याच्या ओघात सांगितले. या भागातील दारूच्या दुकानांपासून तर वैध व अवैध विक्रेत्यांपर्यंतची इत्थंभूत माहिती बुटीबाेरी, एमआयडीसी बुटीबाेरी व हिंगणा पाेलिसांकडे आहे. मात्र, पाेलीस काेणतीही कारवाई करायला तयार नाहीत.
....
मध्यरात्रीपर्यंत विक्री
टाकळघाट व एमआयडीसी परिसरात राेज मध्यरात्रीपर्यंत दारूच्या बाटल्या सहज विकत मिळत असल्याची माहिती काही ग्राहकांनी दिली. दारू दुकानदार व बारमालक नियमांचे पालन करीत नसल्याचेही जाणकार व्यक्तींनी सांगितले. या भागात रात्री उशिरापर्यंत सहज दारू उपलब्ध हाेत असल्याने रात्री ७ वाजतानंतर दारू पिणाऱ्यांचा इतरांना त्रासही सहन कारावा लागताे.
...
दुकान मालक पाेहाेचवितात दारू
दारूविक्री ही अत्यावश्यक सेवेत नसतानाही दारू दुकानदार व बार मालक राेज सकाळी दुकानांचे शटर उघडून दारूची खुलेआम विक्री करतात. काही दुकानदार अवैध दारूविक्रेत्यांना दारूच्या बाटल्या पुरवित असून, त्यांना पाेहाेचवून देतात. काहींनी अवैध दारूविक्रीसाठी काही हस्तकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे दिवसभर शांत असलेल्या या भागात रात्री दारुड्यांचा गाेंधळ सुरू हाेताे.